सौदी अरेबियाने कच्च्या तेलाची ‘ईस्ट-वेस्ट’ पाइपलाइन बंद करण्याची केली घोषणा
रियाद, 12 सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियाने आपली रणनीतिक ‘ईस्ट-वेस्ट’ कच्च्या तेलाची पाइपलाइन खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली आहे. सौदी ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, या पाइपलाइनला एक दिवस आधी रियाद आणि मदीना परिसरात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये लक
Saudi Arabia Shutdown East West Crude Oil Pipeline


रियाद, 12 सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियाने आपली रणनीतिक ‘ईस्ट-वेस्ट’ कच्च्या तेलाची पाइपलाइन खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली आहे. सौदी ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, या पाइपलाइनला एक दिवस आधी रियाद आणि मदीना परिसरात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, मंत्रालयाने या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख जाहीर केलेली नाही. तसेच पाइपलाइनचे किती नुकसान झाले, याचीही माहिती देण्यात आलेली नाही.

इराण सरकारच्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीच्या माहितीनुसार, ‘ईस्ट-वेस्ट’ पाइपलाइन सौदी अरेबियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तिची क्षमता दररोज सुमारे ७० लाख बॅरल इतकी आहे. ही पाइपलाइन देशातील तेलक्षेत्रांना लाल समुद्रावरील (रेड सी) निर्यात टर्मिनलशी जोडते आणि पर्शियन आखातातून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यानंतर या पाइपलाइनचे सामरिक महत्त्व आणखी वाढले आहे. सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी या पाइपलाइनने आपत्कालीन तेलसाठा जारी करण्यापेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सौदी अरेबियाच्या लाल समुद्रावरील तेल निर्यात मार्गावरही दबाव वाढत आहे. येमनकडून सौदी तेल केंद्रांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे आणि समुद्री नाकेबंदीच्या घोषणेनंतर या भागातील तेल वाहतुकीबाबत चिंता वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जुलैमध्ये येमनच्या सैन्याने सौदी अरेबियाविरोधात समुद्री नाकेबंदीची घोषणा करत, याला ‘नाकेबंदीला नाकेबंदी’ अशी रणनीती असल्याचे म्हटले होते. जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये लाल समुद्राच्या मार्गाने होणाऱ्या सौदी तेलाच्या वाहतुकीत मोठी घट नोंदवण्यात आली. पश्चिमेकडील यान्बू शहरातून सौदी कच्चे तेल आणि कंडेन्सेटच्या लोडिंगमध्ये सहा महिन्यांतील नीचांकी पातळी नोंदवण्यात आली. दरम्यान, बाजारातील माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म व्होर्टेक्साने ऑगस्टमध्ये यान्बूमधून होणारे लोडिंग दररोज सुमारे ३२ लाख बॅरल असल्याचा अंदाज व्यक्त केला. तर केप्लरच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण दररोज सुमारे १५ लाख बॅरल होते.

पाइपलाइन बंद करण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा सौदी अरेबियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना ओपेकच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादन घटून दररोज सुमारे ६२.४ लाख बॅरल राहिले. जुलैमध्ये हे उत्पादन सुमारे ८१ लाख बॅरल प्रतिदिन होते. १९९० नंतर सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनाची ही सर्वात नीचांकी पातळी असल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरेबिया आणि ओपेकमधील इतर देश तेल उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर पुढे जात असतानाच ही घट नोंदवण्यात आली आहे.

प्रादेशिक तणाव आणि जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात झालेली घट याचा परिणाम तेल बाजारावरही झाला आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली असून, आठवड्याच्या अखेरीस तेलाच्या किमतीत ८ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. सौदी अरेबियाचे पर्यायी तेल निर्यात मार्गही दीर्घकाळ प्रभावित राहिल्यास जागतिक तेलपुरवठा आणि किमतींवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande