
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
अंमली पदार्थ चरस, एमडी पावडर विक्री करत असलेल्या तरुणावर शहरातील खंडोबा बाजार रस्त्यावरील मराठवाडा हायस्कूल परिसरात कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. या तरुणाच्या ताब्यातून २ लाख ७ हजार ५६० रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघाविरुद्ध नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक संतोष सानप यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील खंडोबा बाजार रस्त्यावरील मराठवाडा हायस्कूल परिसरात चरस, एमडी असे अंमलीपदार्थ बाळगून विक्री करत असल्याच्या माहितीवरून सापळा लावण्यात आला. या सापळा कारवाईत मराठवाडा हायस्कूल परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ७.२० ग्राम एमडी पावडर, चरस, चिलीम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, होंडा कंपनीची स्कूटी, टेक्नो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अमलीपदार्थाबाबत विचारणा केली असता हे पदार्थ नशेसाठी वापरत असल्याचे सांगून विक्री कामी घेतल्याचे आरेपीने सांगितले. यावरून आरोपी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २० (ब) (क) आणि २१(ब) अन्वये नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis