
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय बैठकीदरम्यान जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप करीत महिला मंडळ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर आणि तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिला अधिकारी करमाळा तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असून, शासकीय कामकाजाच्या निमित्ताने त्यांचा आरोपींसोबत संपर्क होता. २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित शासकीय बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बैठकीत महसूल विभागातील कामकाजासंदर्भात चर्चा सुरू असताना राजकुमार पांडेकर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाला. यावेळी जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने तक्रारीत केला आहे. तसेच, दोन्ही आरोपी अंगावर धावून येत धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने तत्काळ पोलिसांत तक्रार देता आली नाही, असे महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देऊनही अपेक्षित कारवाई न झाल्याने अखेर १० सप्टेंबर २०२६ रोजी करमाळा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड