प.बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
कोलकाता, 15 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राममधून मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे माजी सहायक असलेले दिवंगत
WB NANDIGRAM REJINAGAR ELECTION BJP CANDIDATES ANN


कोलकाता, 15 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राममधून मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे माजी सहायक असलेले दिवंगत चंद्रनाथ रथ यांच्या आई हसिरानी रथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रेजीनगरमधून मुर्शिदाबादचे माजी भाजप अध्यक्ष आणि पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य शंकरभ सरकार यांना उमेदवार करण्यात आले आहे.

नंदीग्राममधून हसिरानी रथ यांच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. भाजपच्या औपचारिक घोषणेपूर्वी मंगळवारी सकाळी त्यांनी नंदीग्राममधील रेयापाडा येथील सिद्धेश्वर शिव मंदिर आणि जानकीनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यानंतर त्यांनी स्वतःही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.

चंद्रनाथ रथ यांची ६ मे रोजी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते शुभेंदू अधिकारी यांचे खासगी सहायक होते. चंद्रनाथ हे कारमध्ये चालकाच्या शेजारील सीटवर बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर आणि चालकावर गोळीबार केला. या हल्ल्यात चालकही जखमी झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी चंद्रनाथ यांना मृत घोषित केले. सुरुवातीला राज्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली.

चंद्रनाथ रथ यांचे मूळ घर पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चंडीपूर येथे होते. त्यांच्या हत्येनंतर शुभेंदू अधिकारी यांनी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. चंद्रनाथ यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा विश्वासही दिला होता. त्यावेळी हसिरानी रथ यांनीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला होता. आता भाजपने त्यांना नंदीग्रामसारख्या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हसिरानी रथ यांनी सांगितले की, त्यांना मुख्यमंत्र्यांचा संदेश मिळाला असून पक्ष संघटनेकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. नंदीग्रामच्या जनतेच्या अपेक्षेनुसार बहुतांश कामे दोन वेळा आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी यापूर्वीच केली आहेत, असे त्यांनी सांगितले. नंदीग्रामच्या जनतेला आनंदी ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

६ ऑक्टोबरला मतदान, ९ ऑक्टोबरला निकाल

नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही मतदारसंघांत ६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. मतमोजणीनंतर दोन्ही मतदारसंघांचे निकाल ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जातील.

भाजपच्या आधी डाव्या आघाडीने, काँग्रेसने आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या गटाने संचिता प्रधान दे यांना उमेदवारी दिली आहे, तर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोहम्मद एहताश मुल हक यांना उमेदवारी दिली आहे. डाव्या आघाडीच्या वतीने सीपीआयने शांतिगोपाल गिरी यांना, तर काँग्रेसने मिलन प्रधान यांना रिंगणात उतरवले आहे.

रेजीनगरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल गटाकडून रबिउल आलम चौधरी, तर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाकडून शेख सफीउद्दीन जमान हे उमेदवार आहेत. डाव्या आघाडीच्या वतीने सीपीएमने सईद असद अली यांना, तर काँग्रेसने अब्दुल्लाहिल काफ़ी यांना उमेदवारी दिली आहे. जागावाटपावर सहमती न झाल्यामुळे डाव्या आघाडीतील घटक पक्ष आरएसपीनेही रेजीनगरमधून विकासचंद्र मिश्रा यांना उमेदवार केले आहे.

शुभेंदू अधिकारी यांनी जागा सोडल्याने नंदीग्राममध्ये पोटनिवडणूक

मागील विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामसह भवानीपूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती आणि दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला होता. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी नंदीग्रामची जागा सोडली. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.

त्याचप्रमाणे रेजीनगरमधून आम जनता डेव्हलपमेंट पक्षाचे नेते हुमायूं कबीर यांनी रेझीनगर आणि नाओदा या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी रेजीनगरची जागा सोडली. पोटनिवडणुकीत त्यांनी आपला मुलगा गुलाम नबी आझाद ऊर्फ रॉबिन यांना उमेदवार केले आहे.

दरम्यान, दोन्ही मतदारसंघांत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटांमध्ये ‘जोडाफूल’ या निवडणूक चिन्हावरून परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दोन्ही गटांपैकी पारंपरिक निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार, हे निवडणूक आयोगाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. आयोग याबाबत या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande