
इस्लामाबाद, 15 सप्टेंबर (हिं.स.) : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्यावर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) ७० लाख पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या नव्या रेड बुकमध्ये मसूद अझहरला फरार घोषित करण्यात आले असून, त्याच्यावरील बक्षिसाची रक्कम २० लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्यावर ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याविरोधातील कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
अझहर २०२१ पासून अफगाणिस्तानात असल्याचा दावा
पाकिस्तानने २०२१ पासून मसूद अझहर आपल्या देशात नसल्याचा दावा केला आहे. तो अफगाणिस्तानात पळून गेल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्याच काळात एफआयएने त्याच्यावर ५० लाख पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता सुमारे पाच वर्षांनंतर ही रक्कम वाढवून ७० लाख रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मसूद अझहर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील नवाबशाह येथे लपल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानला मसूद अझहर नेमका कुठे आहे, याची माहिती नसल्याचे म्हटले होते. भारताने अझहर पाकिस्तानात असल्याचे ठोस पुरावे दिल्यास त्याला अटक केली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते.
२६/११ हल्ल्यातील आरोपींची नावेही रेड बुकमध्ये
एफआयएच्या नव्याने अद्ययावत केलेल्या रेड बुकमध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित १९ दहशतवाद्यांची नावेही आहेत. हल्लेखोरांना मदत करणे, आर्थिक सहाय्य पुरवणे किंवा मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी बोटीची व्यवस्था करणे, अशा विविध भूमिकांचा या दहशतवाद्यांवर आरोप आहे.
यापैकी १७ दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या भूमिकेचा तपशील यापूर्वीच्या यादीत होता. मात्र, अद्ययावत यादीत दोन दहशतवाद्यांची छायाचित्रे, लष्कर-ए-तोयबाशी असलेला संबंध आणि त्यांच्या भूमिकेचा तपशील हटवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यांची नावे मात्र कायम ठेवण्यात आली आहेत.
तुर्बत येथील मोहम्मद खानने मुंबईला जाण्यासाठी हल्लेखोरांना ‘अल-हुसेनी’ ही बोट उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. मात्र, नव्या यादीत त्याचे छायाचित्र, लष्कर-ए-तोयबाशी असलेले संबंध आणि भूमिकेचा तपशील वगळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बहावलनगर येथील अब्दुल रहमानचे छायाचित्र आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित माहितीही हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या भूमिकेचा सविस्तर तपशील २०२१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एफआयएच्या यादीत होता. त्यामुळे नव्या रेड बुकमधील बदलांकडेही आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode