
वॉशिंग्टन , 15 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेने प्रथमच अधिकृतपणे मान्य केले आहे की कक्षेतही (ऑर्बिटमध्ये) त्यांची शस्त्रे तैनात आहेत. अमेरिकन स्पेस फोर्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले की, अमेरिकेकडे कक्षेतून अंतराळ नियंत्रणासाठी वापरता येणारी शस्त्रास्त्रे आहेत. ही शस्त्रे शत्रूच्या कारवायांपासून संयुक्त लष्करी दलाचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत.
प्रवक्त्याने सांगितले की, या क्षमतांचा वापर आक्रमक तसेच बचावात्मक दोन्ही उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक, म्हणजेच प्रत्यक्ष भौतिक परिणाम घडवून आणणाऱ्या तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा इतर अप्रत्यक्ष पद्धतींचा समावेश आहे.अमेरिकेच्या मते, अंतराळ आता राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्था तसेच लष्करी यंत्रणा उपग्रहांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. चीन आणि रशियासारख्या देशांकडून वाढत असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी २०१९ मध्ये स्पेस फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, स्पेस कंट्रोलमध्ये अंतराळ क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मोहिमांचा समावेश होतो. यामध्ये शत्रूच्या क्षमता प्रभावित करण्यासाठी कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक पद्धतींचा वापर केला जातो.
अमेरिकेच्या मते, अंतराळ क्षेत्राकडे आता राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जात आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा उपग्रहांसारख्या अंतराळ पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे.शीतयुद्धाच्या काळात शक्तिप्रदर्शनाचे माध्यम ठरलेले अंतराळ आता एक महत्त्वाचे सामरिक क्षेत्र बनले आहे. विविध देश लष्करी आणि तांत्रिक आघाडी मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
अमेरिकन स्पेस फोर्सच्या म्हणण्यानुसार, बीजिंग आणि मॉस्को अनेक नवीन प्रणाली विकसित करत आहेत. त्यांचा उद्देश लष्करी क्षमता वाढवणे आणि अमेरिकेच्या अंतराळ सेवांवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. त्याचबरोबर दोन्ही देश प्रगत काउंटर-स्पेस क्षमतांची चाचणी घेऊन त्यांची तैनातीही करत आहेत. स्पेस फोर्सच्या म्हणण्यानुसार, चिनी लष्कराचे मत आहे की भविष्यातील युद्धांमध्ये अंतराळाची महत्त्वाची भूमिका असेल. त्याच्या मदतीने लांब पल्ल्याचे अचूक हल्ले करता येतील तसेच प्रतिस्पर्धी लष्कराला अंतराळावर आधारित माहितीचा वापर करण्यापासून रोखता येईल.
निवेदनात म्हटले आहे की, चीन आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अंतराळ आणि काउंटर-स्पेस क्षमता विकसित करत आहे.रशिया जगातील सर्वात मोठ्या अंतराळ कार्यक्रमांपैकी एक चालवतो. मात्र, निधीची कमतरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढते एकाकीपण यांसारख्या आव्हानांना त्याला सामोरे जावे लागले आहे. तरीही, स्पेस फोर्सच्या मते, रशिया अजूनही एक सक्षम अंतराळ शक्ती आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, रशिया अंतराळाकडे युद्धभूमी म्हणून पाहतो आणि भविष्यातील युद्धांमध्ये अंतराळावर वर्चस्व मिळवणे हा निर्णायक घटक ठरेल, असे त्याचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode