
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। स्त्रीच्या वाट्याला आलेल्या चौकटी मोडून स्वतःसाठी उभं राहाण्याची ताकद देणाऱ्या ‘बंडखोर’ या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षकगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. बंड, आत्मविश्वास आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची भावना या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत असून चित्रपटाच्या आशयाशी जोडलेला ठाम सूर या गाण्यातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त होत आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि सादरीकरणातून ‘बंडखोर’च्या विचारांची ताकद अधोरेखित होते. या गाण्याला मानसी घोष यांचा आवाज लाभला असून पियुष, महेश यांचे जोशपूर्ण संगीत लाभले आहें. तर वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात रंगत आणली आहे.
‘बंडखोर’चं शीर्षकगीत चित्रपटाची ओळख करून देतानाच अन्यायाविरुद्ध उभं राहाण्याची आणि स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची प्रेरणा देणारं स्फूर्तिदायी गीत ठरतं आहे. दमदार शब्द, जोशपूर्ण संगीत आणि प्रभावी आवाज यांचा सुरेख मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे. स्त्रीला गप्प बसवणाऱ्या चौकटींना आव्हान देत, ‘आपल्या आयुष्याचा निर्णय आपणच घ्यायचा’ हा आत्मविश्वास हे गाणं निर्माण करणारं हे गाणं आहे.
शीर्षकगीताबद्दल संगीतकार पियुष, महेश म्हणतात, “या गाण्याला संगीत देताना त्यातून एक ठाम आणि ताकदीची भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. गाण्याचा प्रत्येक ठेका आणि त्याची रचना ‘बंडखोर’ या नावाला साजेशी असावी, याचा विचार केला. हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना त्याची ऊर्जा जाणवावी हाच आमचा प्रयत्न होता.’’
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “‘बंडखोर’च्या शीर्षकगीतासाठी आम्हाला चित्रपटाचा स्वभाव जाणवून देणारं गीत हवं होतं. त्यामुळे गाण्याचा प्रत्येक भाग हा चित्रपटाच्या भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पडद्यावर हे गीत पाहाताना त्याची ऊर्जा आणि कलाकारांचा आत्मविश्वास प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल.”
संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून संवाद लेखन सिद्धार्थ साळवी, इरावती कर्णिक यांनी केले आहे. छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule