
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हिं.स.) । लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, पण अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने ६ ऑक्टोबर रोजी ब्युनोस आयर्स येथे बेनिनविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी मेस्सीचा २८ सदस्यीय संघात समावेश केला आहे. त्यामुळे, अर्जेंटिनाच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या मेस्सीसाठी हा सामना निरोपाचा सामना असेल का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
मेस्सीने स्वतः अद्याप या सामन्यातील आपल्या सहभागाची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. पण, अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ तापिया यांनी सांगितले आहे की, या स्टार फुटबॉलपटूने आमंत्रण स्वीकारले आहे. जर मेस्सी मैदानात उतरला, तर अर्जेंटिनाच्या जर्सीमधील हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो.
अर्जेंटाइन फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ तापिया म्हणाले की, मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मेस्सीला सामन्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तापिया म्हणाले, वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आम्ही जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू, आमचा आदर्श आणि आमचा कर्णधार, लिओनेल मेस्सीला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्याला ६ ऑक्टोबर रोजी योग्य तो निरोप समारंभ मिळू शकेल. बेनिनविरुद्धचा सामना ब्युनोस आयर्समध्ये खेळला जाईल. अर्जेंटिनासाठी आपल्या कर्णधाराला आणि त्यांच्या सर्वात मोठ्या स्टार फुटबॉलपटूंपैकी एकाला मायदेशात निरोप देण्याची ही एक संधी देखील असू शकते.
मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२२ मध्ये फिफा विश्वचषक जिंकला. कतारमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत संघाच्या विजयात मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याने राष्ट्रीय संघासोबत आपली कारकीर्द पुढे चालू ठेवली. २०२६ मध्येही मेस्सी अर्जेंटिनाच्या संघात होता, मात्र अंतिम सामन्यात संघाला स्पेनकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर, मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ३१ ऑगस्ट रोजी, मेस्सीने एका विस्तृत सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निर्णयाची घोषणा केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे