बांग्लादेशच्या टी-20 विश्वचषकातून माघारीसाठी आसिफ नझरुल जबाबदार; चौकशी समितीचा निष्कर्ष
ढाका, 16 सप्टेंबर (हिं.स.) । भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयासाठी, बांगलादेश सरकारच्या चौकशीत तत्कालीन अंतरिम सरकारमधील क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल यांनाच पूर्णपणे जबाबदार धरण्यात आले आहे. तीन सदस्यांच्या समितीने बांगलादेश
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड लोगो


ढाका, 16 सप्टेंबर (हिं.स.) । भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयासाठी, बांगलादेश सरकारच्या चौकशीत तत्कालीन अंतरिम सरकारमधील क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल यांनाच पूर्णपणे जबाबदार धरण्यात आले आहे. तीन सदस्यांच्या समितीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या त्रुटींकडेही लक्ष वेधले. या महत्त्वाच्या मुद्द्यावर काम करताना बोर्डाकडे स्वतंत्र धोरणात्मक नेतृत्व, संकटकाळात मुत्सद्देगिरीने वागण्याची क्षमता आणि दीर्घकालीन नियोजनाचा अभाव होता, असे समितीने नमूद केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीबी यांच्यात तीन आठवडे चाललेल्या चर्चेनंतर, २४ जानेवारी रोजी आयसीसीने टी20 विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला होता. भारतात सामने खेळण्यास बीसीबीने नकार दिल्यानंतर, आयसीसीच्या बहुसंख्य सदस्यांनी बांगलादेशच्या सहभागाच्या विरोधात मतदान केले आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा बीसीसीआयने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला इंडियन प्रीमियर लीग मधून वगळले होते. लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करारबद्ध केले होते.

मुस्तफिजुरचा मुद्दा बोर्डाच्या माध्यमातून हाताळण्याऐवजी, आसिफ नझरुल यांनी फेसबुकवर घोषणा केली की, बांगलादेश भारतात टी-20 विश्वचषकाचे सामने खेळणार नाही. नझरुल हे त्यावेळी देशाचे क्रीडा मंत्री म्हणून काम पाहत होते. या घोषणेमुळे बीसीबीकडे हालचालीसाठी फारसा वाव उरला नाही. त्यानंतर बीसीबीने आयसीसीकडे बांगलादेशचे सामने सह-यजमान असलेल्या श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. पण प्रशासकीय मंडळाने ती विनंती फेटाळून लावली.

मे महिन्यात बांगलादेशचे नवीन क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी टी 20 विश्वचषकातून संघाच्या माघार घेण्यामागच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीचे प्रमुख युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासन उपविभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. एकेएम ओली उल्लाह होते; तसेच यात बांगलादेशचे माजी कर्णधार हबीबुल बशर आणि बॅरिस्टर फैसल दस्तगीर यांचाही समावेश होता.

समितीने बांगलादेशचा टी20 कर्णधार लिटन दास, कसोटी कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन, तसेच बीसीबीचे अध्यक्ष तमीम इक्बाल, मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी आणि माजी सरचिटणीस सय्यद अशरफुल हक यांची मुलाखत घेतली. अहवालात नमूद केल्यानुसार, मुलाखत घेतलेल्या जवळपास सर्वच जणांनी बांगलादेशच्या टी-२० विश्वचषकातील सहभागाबाबतचा निर्णय घेणारे 'एकमेव व्यक्ती' म्हणून नझरुल यांचे नाव घेतले.

आयसीसीने असा इशारा दिला होता की, जर बीसीबीने भारतात सामने खेळण्यास नकार दिला तर बांगलादेशच्या जागी दुसऱ्या संघाचा समावेश केला जाईल. या इशाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नझरुल यांच्यासोबत एक बैठक झाली होती, ज्यामध्ये शांतो आणि लिटन हे देखील उपस्थित होते. अहवालानुसार, शांतो आणि लिटन या दोघांनीही सांगितले की, क्रिकेटपटू भारतात जाण्यास आणि विश्वचषकाचे सामने खेळण्यास सकारात्मक असूनही नझरुल यांनीच याबाबतचा निर्णय घेतला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande