सोलापूरात दुष्काळी स्थितीचा दूध उत्पादनाला फटका; खरेदी दरात वाढ
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळी स्थिती आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई आणि त्याचा दूध उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे दूध संकलनासाठी विविध दूध संस्था
Milk


सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

दुष्काळी स्थिती आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई आणि त्याचा दूध उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे दूध संकलनासाठी विविध दूध संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. गायीच्या दुधाचा जाहीर खरेदी दर प्रतिलिटर ४१ रुपये असताना काही संस्थांकडून ४३ रुपयांपर्यंत दर दिला जात असल्याने दूध संकलनासाठी पळवापळवी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक सहकारी दूध संस्थांसह शेजारील जिल्ह्यांतील तसेच परराज्यांतील खासगी दूध संस्थांकडूनही दूध खरेदी केले जाते. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ११ ऑगस्टपासून वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरपासून आणखी एक रुपयाची वाढ झाल्याने जाहीर खरेदी दर प्रतिलिटर ४१ रुपयांवर पोहोचला आहे.

मात्र, दूध संकलनाची गरज पूर्ण करण्यासाठी काही दूध संस्था प्रतिलिटर ४३ रुपये दर देत आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी संस्थांमध्ये स्पर्धा वाढली असून, उपलब्ध दूध आपल्या संस्थेकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरातही वाढ झाली असून, तो प्रतिलिटर ५४ रुपयांवरून ५५.२० रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच दुष्काळी परिस्थिती कायम राहिल्यास दूध उत्पादनावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दूध खरेदी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande