रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवात 'लोकसंवाद'
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील टिळक आळी गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रम काल (दि. १६ सप्टेंबर) रात्री पार पडला. टिळक आळी गणेशोत्सवाचे यंदाचे १०१वे वर्षे आहे. त्यानिम
टिळक आळी गणेशोत्सवातील लोकसंवाद


रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील टिळक आळी गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रम काल (दि. १६ सप्टेंबर) रात्री पार पडला.

टिळक आळी गणेशोत्सवाचे यंदाचे १०१वे वर्षे आहे. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोजगारविषयक विशेष संवाद पार पडला. कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या महारोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती दिली.

पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात ५०० हून अधिक रोजगार मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले असून, या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यात एकाच दिवशी २९ सप्टेंबर रोजी १२ विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जाणार आहेत. सुशिक्षित तरुण-तरुणींना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि एकाच छताखाली नोकरी शोधणारे, उद्योजक व शैक्षणिक संस्था यांना एकत्र आणणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे श्री चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यातील मेळाव्यांची ठिकाणे अशी - रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय. मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय. दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. खेड : ज्ञानदीप विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच शिवतेज आरोग्य सोसायटी हॉल. गुहागर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI). चिपळूण : खेर्डी-सती येथील शाळा. लांजा : कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. संगमेश्वर : देवरूख येथील डीकॅड कॉलेज आणि राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय. राजापूर : राजापूर हायस्कूल.

मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. उमेदवारांची नोंदणी, उद्योजकांसाठी नोंदणी आणि शासकीय योजनांची माहिती देणारा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप, या तिन्हींसाठी विशेष ‘क्यूआर कोड’ मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गरजू व सुशिक्षित तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविकात लोकसंवाद कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, सचिव मंदार खेर, उत्सव सचिव उपेंद्र खेर, विश्वस्त प्रभाकर करमरकर, अरुण करमरकर, कौशल्य विकास अधिकारी मोरेश्वर दुधाळ आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande