
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । शहरातील रस्त्यांवर वाढलेली मोकाट जनावरे, बंद पथदिवे, रस्त्यांच्या दुतर्फा पुसलेल्या साइड पट्ट्या तसेच खड्डेमय अंतर्गत रस्ते या नागरी समस्यांकडे रत्नागिरी पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वारांसह पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांची योग्य त्या गोशाळा अथवा निवारा केंद्रात रवानगी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हादेखील शहरातील गंभीर प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे. विशेषतः रात्री कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने नियमानुसार निर्बीजीकरणासह आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
हे प्रश्न केवळ सुविधांशी संबंधित नसून नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेशी निगडित असल्याने प्रशासनाने त्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून मांडली आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कृष्णा कांबळे, महासचिव बिपिन अजित आयरे, सल्लागार अजित लक्ष्मण जाधव, शहराध्यक्ष विनोद कांबळे तसेच सदस्य सुभाष कदम, सुरेश पवार आणि अशोक जाधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी