ईडीची कारवाई : तिरुपती तुप घोटाळ्यात कैलाशचंद मंगला अटकेत
पीएमएलएअंतर्गत कारवाई, आरोपीला न्यायालयीन कोठडी हैदराबाद, 18 सप्टेंबर (हिं.स.) : तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) भेसळयुक्त तुपाचा पुरवठा केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने स
प्रवर्तन निदेशालय (ईडी)


पीएमएलएअंतर्गत कारवाई, आरोपीला न्यायालयीन कोठडी

हैदराबाद, 18 सप्टेंबर (हिं.स.) : तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) भेसळयुक्त तुपाचा पुरवठा केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने सुकृती फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक कैलाश चंद मंगला यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या कलम 19 अंतर्गत अटक केली आहे.मंगला यांना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील पीएमएलए विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

तिरुपती ईस्ट पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. टीटीडीला कथित भेसळयुक्त तुपाचा फसवणुकीच्या माध्यमातून पुरवठा केल्याप्रकरणी गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि भ्रष्टाचाराचे आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आले आहेत.ईडीच्या तपासानुसार, 2019 ते 2024 या कालावधीत टीटीडीला करण्यात आलेल्या कथित भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याची एकूण किंमत सुमारे 230 कोटी रुपये होती. त्यापैकी सुमारे 96 कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप कैलाश चंद मंगला यांनी तयार केल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

पाम ऑइलपासून ‘गायीच्या तुपा’पर्यंत

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कथित भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी रिफाइंड पाम ऑइल, पाम कर्नल ऑइल, पामोलिन, एमजी-90, मोनोग्लिसराइड्स, मायवासेट सॉफ्ट 400 आणि ऍसिटिक ऍसिड एस्टर यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.तयार केलेले हे उत्पादन ‘ऍगमार्क स्पेशल ग्रेड काऊ घी’ असल्याचे भासवून टीटीडीला पुरवण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

फ्रंट कंपन्यांमार्फत पुरवठ्याचे जाळे

ईडीच्या म्हणण्यानुसार, कैलाश चंद मंगला यांनी भेसळीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली आणि त्यांच्या कारखान्यात कथित भेसळयुक्त तूप तयार करण्यात भूमिका बजावली. तसेच वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मालगंगा मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एआर डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून कथित भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन केल्याचा आरोप आहे.

खोट्या नोंदींचाही आरोप

तपासादरम्यान तूप आणि रिफाइंड पाम ऑइलच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कथित खोट्या नोंदी तयार करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. भेसळयुक्त पदार्थांचा प्रत्यक्ष वापर लपवणे आणि शुद्ध गायीच्या तुपाचे उत्पादन व पुरवठा झाल्याचे चित्र निर्माण करणे, हा या नोंदींमागील कथित उद्देश असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

यापूर्वी विपिन जैन यांनाही अटक

या प्रकरणात ईडीने यापूर्वी भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी मिल्क प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आणि संचालक विपिन जैन यांना अटक केली होती. टीटीडीला कथित भेसळयुक्त तूप तयार करून त्याचा फसवणुकीच्या माध्यमातून पुरवठा करण्याच्या कटात त्यांची भूमिका असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणातील पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande