महाराष्ट्रात 20 व्या रोजगार मेळाव्यात 1,186 नियुक्तीपत्रांचे वितरण
* पंतप्रधान मोदींचे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना निष्ठेने सेवा बजावण्याचे आवाहन मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे आज विसाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान


रोजगार मेळावा


* पंतप्रधान मोदींचे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना निष्ठेने सेवा बजावण्याचे आवाहन

मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.) -

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे आज विसाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला आणि देशभरातील नवनियुक्त तरुणांना संबोधित केले. महाराष्ट्रातील,चार शहरांमधील विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या एकूण 1,186 उमेदवारांना यावेळी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. देशभरातील 45 ठिकाणी 51,000 हून अधिक जणांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली, त्यामुळे रोजगार मेळ्यांमार्फत वितरित करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रांची एकूण संख्या सुमारे 12.75 लाख झाली आहे.

भारत 2047 पर्यंत 'विकसित भारत'या ध्येयाकडे वाटचाल करत असताना,एका महत्त्वपूर्ण वेळी तुम्हा सर्वांचा शासकीय सेवेत प्रवेश झाला आहे; असे नवनियुक्त तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “तुमचे वर्तन, तुमची संवेदनशीलता, तुमची कार्यक्षमता, तुमचा प्रामाणिकपणा—या सर्वांवरूनच नागरिकांना सरकारसोबतचा अनुभव कसा असेल, हे ठरेल.”असे, नागरिक-केंद्रित शासनावर भर देत पंतप्रधान म्हणाले.त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण, स्किल इंडिया मिशन, कार्यानुभव कार्यक्रम आणि पीएम-सेतू यांवरही प्रकाश टाकला आणि नवनियुक्त तरुणांना आपली कौशल्ये सतत अद्ययावत करण्याचे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आणि सेवेच्या भावनेने काम करण्याचे आवाहन केले.

विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी देखील या कार्यक्रमात दूरदृश्य माध्यमातून सहभाग घेतला आणि रोजगार निर्मितीप्रती सरकारची वचनबद्धता कृतीत उतरवण्यासाठी रोजगार मेळा हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे अधोरेखित केले.

नागपूर येथील रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना जनतेप्रती संवेदनशीलता बाळगून काम करण्याचे आवाहन केले. “जे कर्मचारी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून प्रशासनात आपली क्षमता सिद्ध करतात, त्यांना जनता आणि त्यांचे सहकारी दोघेही लक्षात ठेवतात. त्यामुळे, लोकांप्रती संवेदनशीलतेने काम करायला पाहिजे;”असेही ते पुढे म्हणाले.नागपूरमध्ये एकूण 337 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. विभागनिहाय वाटपामध्ये आयकर विभाग (135), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (130), मध्य रेल्वे (25), टपाल विभाग (20) एएआय (AAI - 14), एम्स (AIIMS - 8), बँक ऑफ बडोदा (2), इंडियन ओव्हरसीज बँक (2) आणि एमओएसपीआय (MoSPI - 2) यांचा समावेश आहे.

ठाणे येथे झालेल्या 'रोजगार मेळाव्या'ला संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी, हा रोजगार मेळावा केवळ नियुक्तीपत्रे वितरित करण्याचा कार्यक्रम नसून, 'विकसित भारत @2047' चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे, भ्रष्टाचाराप्रति 'शून्य सहिष्णुता' बाळगण्याचे आणि समाजातील शेवटच्या घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले.

ठाणे येथे, प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयआयटी मुंबई (14), मध्य रेल्वे (15), टपाल विभाग (1), सर्व्हे ऑफ इंडिया (3), सीबीआयसी (10) आणि सीबीडीटी/प्राप्तिकर विभाग (96) यांसारख्या संस्थांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या 139 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत, तरुणांसाठी संधी निर्माण करण्यात शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि क्रीडा या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा क्षेत्रामुळे शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते; त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगाराच्या अधिक संधी मिळाल्यास, तरुणांना राष्ट्रनिर्माणात खऱ्या अर्थाने योगदान देणे शक्य होते, असे त्या म्हणाल्या.

मुंबईत 273 उमेदवार प्रत्यक्षपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते, तर 550 जण दूरस्थ (व्हर्च्युअल) पद्धतीने सहभागी झाले. वितरित करण्यात आलेल्या 273 नियुक्तीपत्रांपैकी 214 हून अधिक पत्रे ही 'प्राप्तिकर विभाग' आणि 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ' (सीबीआयसी) च्या अखत्यारीत येणाऱ्या पदांसाठीची होती. या नियुक्त्यांमध्ये रेल्वे (5), टपाल विभाग (8), वित्तीय सेवा विभाग/इंडियन ओव्हरसीज बँक (5), ईपीएफओ (1), एचपीसीएल (10), सीआयएसएफ (1), भारतीय विमानतळ प्राधिकरण (12), एमओएसपीआय (3) आणि प्राप्तिकर विभाग (228) या विभागांचा समावेश होता; यामध्ये प्राप्तिकर विभागातील नियुक्त्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.

पुण्यामध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; या मेळाव्यात 223 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये डीआरडीओमधील (94), गेल (1), जलसंपदा विभाग (1), बँक ऑफ महाराष्ट्र (1), सीबीआयसी (32), सीबीडीटी (11), नागरी उड्डाण मंत्रालय/एएआय (29), सीएपीएफ (1), रेल्वे (21) आणि टपाल विभाग (32) पदांचा समावेश होता.

नव्याने नियुक्त करण्यात आलेले हे कर्मचारी महसूल, रेल्वे, गृह, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वित्तीय सेवा आणि संरक्षण यांसह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande