
दिंडोरी, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
- टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या टोमॅटोला बाजारात क्रेटला अवघा 200 ते 250 रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे. टोमॅटो पिकासाठी शेतकर्यांना एकरी सुमारे दोन लाखांच्या पुढे खर्च करावा लागतो.
मागील काही दिवसांपासून सातत्याने टोमॅटोच्या दरांमध्ये वाढ झाली होती टोमॅटोचा बाजार समितीमध्ये एका क्रेटला दर साडेसातशे ते आठशे रुपये पर्यंत गेलेला होता त्यामुळे मधल्या काळामध्ये टोमॅटो चे दर गगनाला भेटले होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटो हा जीवनातून हद्दपार करावा लागला होता. या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे उत्पादन सतत सुरू असलेल्या पावसामुळे देखील घटले होते असे या क्षेत्रातील जानकारांकडून सांगण्यात येत आहे.
काही दिवसापासून वातावरणाच्या बदलमुळे महागडी औषधे फवारावी लागले. त्यामुळे साहजिकच खर्च वाढला. त्यात टोमॅटो खुडण्यासाठी क्रेटमागे सुमारे 25 रुपये मजुरी घेतली जाते तर बाजार समितीत माल वाहून नेण्यासाठी क्रेटमागे सुमारे 25 रुपये वाहतूक खर्च येत आहे. त्यामुळे मिळणार्या दराच्या तुलनेत उत्पादन, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठा असल्याने शेतकर्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही. टोमॅटोच्या दरात सातत्याने होणार्या चढ-उतारामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कधी भाव वाढतो तर काही दिवसांतच दरात मोठी घसरण होते. त्यामुळे बाजारातील अनिश्चिततेचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना टोमॅटोला मिळणारा कमी भाव शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत टोमॅटोची ‘लाली’ही फिकी पडल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.
टोमॅटो पिकासाठी एकरी जवळपास दोन लाख रुपये खर्च येतो. सध्या क्रेटला 200 ते 250 रुपये भाव मिळत असून, त्यातून खुडणीसाठी 25 रुपये आणि वाहतुकीसाठी 25 रुपये खर्च होतो. मजुरी, औषधे, खते, पाणी आणि इतर खर्च पाहता हातात काहीच शिल्लक राहत नाही. दरात अशीच घसरण सुरू राहिली तर टोमॅटो उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाने बाजारभाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना करून शेतकर्यांना दिलासा द्यावा.
-पंकज चौधरी,
टोमॅटो उत्पादक शेतकरी, दिंडोरी
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI