
थकीत भरपाईशिवाय साधुग्रामसाठी जमीन न देण्याचा निर्धार
नाशिक, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे १३०० एकरांवरील अतिरिक्त साधुग्राम उभारणीसाठी जमिनीच्या तात्पुरत्या भाडेपट्टावरून सुरू असलेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. शनिवारी (दि. १९) येथे शेतकरी कृती समितीची जेजुरकर लॉन्स येथे शेतकऱ्यांची पुन्हा स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत २५ वर्षांपासूनची थकीत भरपाई व्याजासह मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नाही, असा ठाम आणि एकमुखी निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शुक्रवारी नांदूर येथील बैठकीवर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला. कुंभमेळा हा नाशिक व टाकळी शिवारात होत असताना केवळ मोजक्या लोकांशी चर्चा करून अन्य शेतकऱ्यांना डावलले गेले असा आरोप शेतकरी कृती समितीचे सदस्य समाधान जेजूरकर व उपस्थितांनी केला.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, मिरची हॉटेल ते संगम ब्रिज, नांदूर-नाशिक शिवार रस्ता आणि जत्रा रोड हे तीन डी.पी. रस्ते, एसटीपी प्रकल्प आणि ३७७ एकर साधुग्राम या ५ जुन्या प्रलंबित विषयांवर प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा. महापालिकेसोबत भाडेतत्त्वावर किंवा कोणत्याही प्रकारचा करार करण्याचा कायदेशीर अधिकार शेतकरी किंवा महापालिकेला नाही. अशा करारांमुळे भविष्यात कर किंवा अन्य भुर्दंड शेतकऱ्यांवर पडू शकतो, त्यामुळे कोणताही तात्पुरता अथवा वाढीव साधुग्रामसाठी नवीन करार मान्य केला जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले. बैठकीस उद्धव निमसे, नगरसेवक रिद्दीश निमसे, जयवंत जेजूरकर, नामदेव शिंदे, सुरेश खेताडे, समाधान जेजूरकर, सागर पवार, रवी थोरात, विशाल जेजूरकर, कैलास कोठवळे, संजय बनकर, ललित उन्हाळे, रामभाऊ सूर्यवंशी, संपत क्षीरसागर यांच्यासह नाशिक शिवार, आगर टाकळी व नांदूर भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI