
* शेतकऱ्यांनी चिंता करू नये; शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषी मंत्री
नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.) - पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड, हिंगोली व वाशिम जिल्ह्यांतील विविध भागांना भेट देऊन पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पिकांवरील परिणाम तसेच संभाव्य नुकसानाबाबत माहिती घेतली.
नांदेड जिल्ह्यातील पुयणी (ता. नांदेड) येथे श्री.भरणे यांनी पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पावसातील खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव, टाकळगाव बोराळा परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. तसेच हिवरा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथेही त्यांनी पीक परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिम व मनोरा तालुक्यातील गावातील शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली आहे. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनय आवटे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे उपनगराध्यक्ष राजकुमार एगडे, पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “पावसाअभावी काही भागांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आली आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील”
पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची झालेली हानी, सुकलेली पिके तसेच आगामी काळातील संभाव्य पीक नुकसानीबाबत कृषी मंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या व मागण्यांची त्यांनी आस्थेने दखल घेतली.
पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या अडचणींचा प्राधान्याने विचार करून शासनाच्या प्रचलित निकषांनुसार आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी व स्थानिक परिस्थितीची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवून घ्यावी आणि आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी ट्रिगर लागू झालेले आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश आहे. वसमत तालुक्याचा या दुष्काळी यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशा माध्यमाची पोस्ट विविध समाज माध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत आहे. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी सदर पोस्ट ही बनावट असून यामध्ये कोणतीही सत्यता नाही. शासनामार्फत अशा प्रकारची कोणतीही यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये, केवळ शासनामार्फत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी