
नांदेडच्या दुष्काळी बैठकीवरून प्रशासनाला कानपिचक्या
नागपूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील खासदार संजय जाधव यांचा काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करत, ‘शेतकरी उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी’ असा आरोप केला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला कानपिचक्या देत दुष्काळी परिस्थितीत अशा गोष्टी टाळल्या पाहिजे असे सांगितले.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, बैठकीदरम्यान प्रशासनाकडून पाहुण्यांसाठी काजू-बदाम आदी पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. कोणीही जाणीवपूर्वक दुष्काळाच्या नावाखाली असे करत नाही; मात्र प्रशासनाने संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने खंड दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असून, पुढील आठवडाभरात प्राथमिक आढावा घेण्यात येईल. त्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाणी, चारा आणि वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अल निनोच्या संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन वैरण विकासाचा कार्यक्रम आधीच हाती घेण्यात आला होता. ज्या भागात गरज असेल, त्या ठिकाणी चारा उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पीक वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे अतिरिक्त वीजपुरवठा करण्याचेही त्यांनी सांगितले. सिंगल फेजमुळे ज्या ठिकाणी वीजपुरवठा मर्यादित होता, तिथेही आवश्यकतेनुसार वीज देण्यात येईल. संध्याकाळच्या वेळेतही वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
कर्जमाफीच्या उर्वरित याद्या तयार करणार
कर्जमाफीच्या तीन याद्या झाल्या असून, उर्वरित याद्याही तयार करण्यात येतील. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक नियम आणि शासन निर्णय असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या नियमांचे पालन केल्यानंतरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत मदत मिळते. त्यानुसार 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पंचनाम्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल.मात्र, केंद्राकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.------------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar