
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।गणेश विसर्जन मिरवणुकीत विना परवानगी डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांविरोधात देवणी पोलिसांनी कारवाई केली. मोघा येथे श्री राजे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे-डॉल्बी वाजवल्याप्रकरणी वाहनासह संपूर्ण डीजे साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोघा, ता. देवणी येथे श्री राजे गणेश मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सुधाकर गोविंद हनमंते, रा. सय्यदपूर, ता. देवणी व इतरांनी शासनाची परवानगी न घेता एमएच-24-एफ-8605 क्रमांकाच्या वाहनावर अवजड डीजे यंत्रणा बसवून मोठ्या आवाजात गाणी वाजवली.डीजे बसविण्यात आलेल्या वाहनाच्या मूळ रचनेत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता बदल करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासोबतच मोटार वाहन कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे समोर आले.या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, कलम ३(५) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी हे वाहन, डीजे-डॉल्बी सिस्टीम, स्पीकर आणि अँप्लीफायर असा मुद्देमाल जप्त केला असून, त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक १५८१ गुणाले करीत आहेत.
पोलिसांचा मंडळांना इशारा
गणेशोत्सवापूर्वीच लातूर पोलिसांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांना डीजे-डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही विना परवानगी डीजे-डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर देवणी पोलिसांनी कारवाई केली.
जिल्ह्यात कुठेही विना परवानगी डीजे-डॉल्बीचा वापर झाल्यास वाहनासह डीजे साहित्य जप्त करून संबंधित मंडळाचे पदाधिकारी आणि चालक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.ही कारवाई देवणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis