जळगाव : खिर्डीतील घरफोडी टोळीचा भंडाफोड, 5 जणांना अटक
- तीन घरफोडींचा छडा, ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव, २३ सप्टेंबर (हिं.स.) : रावेर तालुक्यातील खिर्डी येथे घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा निंभोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलि
जळगाव : खिर्डीतील घरफोडी टोळीचा भंडाफोड, 5 जणांना अटक


- तीन घरफोडींचा छडा, ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव, २३ सप्टेंबर (हिं.स.) : रावेर तालुक्यातील खिर्डी येथे घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा निंभोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुंबईतून एका आरोपीसह खिर्डी येथून चार आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील तब्बल ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी येथे राहणाऱ्या शेहनाज शेख अख्तर या कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला वेग दिला.

तपासादरम्यान पोलिसांनी नवाज शेख शरीफ (वय २३) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत त्याची अधिक चौकशी केली असता त्याने शहादत बेग रफिक बेग, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान आणि शाकीब बेग साबीर बेग यांच्या साथीने घरफोडी केल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना करण्यात आले. तेथून शहादत बेग याला, तर खिर्डी येथून अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख आणि शाकीब बेग यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांच्या मुद्देमालापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी खिर्डी गावात याच गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. या तपासातून चेतन लिलाधर जाधव (वय २९) याचेही नाव निष्पन्न झाले. या दोन्ही गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालापैकी ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.

हस्तगत मुद्देमालामध्ये सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ आणि गणेशाच्या मूर्तींसह सोन्या-चांदीचे विविध दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

अशाप्रकारे तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या कारवाईत नवाज शेख शरीफ, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान, शहादत बेग रफिक बेग, चेतन लिलाधर जाधव आणि शाकीब बेग साबीर बेग या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून निंभोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande