
नागोया (जपान), 24 सप्टेंबर (हिं.स.) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू सीमा कुमारीने महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले. याचदरम्यान, महिलांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) प्रकारात भारताच्या आशा इलांगोचे पदक थोडक्यात हुकले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर निहारिका वशिष्ठने १० व्या स्थानावर शर्यत पूर्ण केली.
विनफ्रेड यावी आणि नोझोमी तनाका यांच्यात सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी चुरशीची लढत सुरू होती, तेव्हा सीमा शेवटपर्यंत पदकाच्या शर्यतीत टिकून राहिली. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात सीमाने आपल्यामागून येणाऱ्या स्पर्धकांना मागे टाकत तिसरे स्थान निश्चित केले आणि भारताच्या ॲथलेटिक्स पदकांच्या यादीत आणखी एका पदकाची भर घातली.
विनफ्रेड यावीने ३२:३९.१८ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले, तर जपानच्या नोझोमी तनाकाने ३२:४१.५४ मिनिटांच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावत रौप्य पदक मिळवले. भारताच्या सीमा कुमारीने महिलांच्या १०,००० मीटरच्या अंतिम फेरीत ३२:५०.०५ मिनिटांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, महिलांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) प्रकारात भारताच्याआशाने १३.८३ मीटरची सर्वोत्तम उडी मारली आणि चीनच्या कांस्यपदक विजेत्या ली यीच्या कामगिरीशी बरोबरी साधली. मात्र, 'काऊंटबॅक'च्या नियमानुसार तिला कांस्यपदक हुकले. कारण तिची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी १३.६५ मीटर होती, जी ली यीच्या १३.७९ मीटरच्या कामगिरीपेक्षा कमी ठरली. आशाचा सहावा आणि अंतिम प्रयत्न १३.५९ मीटरचा होता; त्यामुळे एकूणच दमदार कामगिरी करूनही तिला पदकापासून वंचित राहावे लागले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे