
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर (हिं.स.)केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबईतील 'नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स' संस्थेतर्फे 30 सप्टेंबर 2026 रोजी पुरुष आणि महिला कुस्तीसाठी निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्या मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली रोडवरील 'एसएआय श्री अटलबिहारी वाजपेयी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे आयोजित केल्या जातील.
17-वर्षांखालील, 20-वर्षांखालील आणि 23-वर्षांखालील वयोगटांतील पात्र मुला-मुलींसाठी या निवड चाचण्या खुल्या आहेत. चाचण्यांसाठीचे वजनी गट खालीलप्रमाणे आहेत:
महिला कुस्ती: मुली – 50 किलो आणि त्याहून अधिक
फ्रीस्टाईल कुस्ती: मुले – 57 किलो आणि त्याहून अधिक
ग्रीको-रोमन कुस्ती: मुले – 55 किलो ते 130 किलो
या चाचणीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी 30 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र खेळाडूंनी चाचणीसाठी येताना आपले वय, ओळख आणि पात्रतेचे निकष सिद्ध करणारी सर्व मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि इतर नोंदी सोबत आणणे बंधनकारक आहे. या चाचण्यांमुळे पात्र युवा कुस्तीगीरांना 'एसएआय' नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, मुंबई येथे प्रशिक्षणासाठीच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
खेळांना प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य साध्य करणे हे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी 'भारतीय क्रीडा प्राधिकरण' (एसएआय) कडे सोपवण्यात आली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासोबतच, युवकांमधील गुणवंत खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून, एसएआय ने भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एसएआयची संपूर्ण देशभरातील विविध प्रादेशिक केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रांमार्फत या योजनांची अंमलबजावणी केली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे