
अमरावती, 25 सप्टेंबर (हिं.स.)। पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवार, २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी होणार आहे.
या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जनादरम्यान पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ हजार ८५३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्यांच्या दिमतीला आरसीपी, क्यूआरटी प्लाटूनसह एसआरपीएफची कंपनीसुद्धा राहणार आहे.
श्री गणेश विसर्जनासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात ३ पोलीस उपायुक्त, ५ साहाय्यक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, ७० साहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ७५० पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्यांच्या दिमतीला आरसीपी, क्यूआरटी प्लाटून, एसआरपीएफची कंपनी तसेच महिला व पुरुष होमगार्ड राहणार आहेत. शिवाय, पोलीस ठाणेनिहाय महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे, मिश्र व संवेदनशिल वसतिच्या ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेकरिता १४ सीआर मोबाइल, १० दामिनी पथके, बीट मार्शल व डायल ११२ ची वाहने शहरात सतत गस्त घालणार आहेत.
सोशल मीडियावर करडी नजर
सायबर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाकडून सोशल मीडियावर सतत वॉच ठेवण्यात येणार असून, मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही, व्हिडीओग्राफर यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे, काठ्या, आक्षेपार्ह गाणे वाजविणे, आक्षेपार्ह देखावे प्रदर्शित करणे इत्यादी बाबींना मनाई करण्यात आलेली आहे. तसेच, सराईत गुन्हेगार, धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, जातीय दंगलीतील आरोपींना डिटेन करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी