मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाकडून 'मोतीलाल ओसवाल निफ्टी रिट्स अँड रियल्टी इंडेक्स फंड' सादर
* एनएफओ 9 ऑक्टोबरला होणार बंद मुंबई, २५ सप्टेंबर (हिं.स.) : मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने ''मोतीलाल ओसवाल निफ्टी रिट्स अँड रियल्टी इंडेक्स फंड'' (Motilal Oswal Nifty RIETs & Realty Index Fund) ही आपली नवीन फंड योजना बाजारात आणण्याची घोषणा

मोतीलाल ओसवाल

* एनएफओ 9 ऑक्टोबरला होणार बंद

 

मुंबई, २५ सप्टेंबर (हिं.स.) : मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने 'मोतीलाल ओसवाल निफ्टी रिट्स अँड रियल्टी इंडेक्स फंड' (Motilal Oswal Nifty RIETs & Realty Index Fund) ही आपली नवीन फंड योजना बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ही योजना निफ्टी रिट्स अँड रियल्टी टोटल रिटर्न इंडेक्सचे अनुकरण करणारी ओपन-एंन्डेड योजना असून, ट्रॅकिंग एररचा विचार करता ती भारतातील शेअर बाजारात नोंदणीकृत रीट आणि रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देते.

पारंपरिकरीत्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं, तर थेट स्वतःच्या नावावर जागा किंवा घर खरेदी करावे लागायचे. यासाठी सुरुवातीलाच खूप मोठी रक्कम लागते आणि अडचण आल्यास ही मालमत्ता लगेच विकून रोख रक्कम मिळवणेही तितके सोपे नसते. एकीकडे रीटमुळे नियमित भाड्याचे उत्पन्न देणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांमध्ये शेअर बाजाराच्या माध्यमातून सहज खरेदी-विक्री करणे शक्य झाले आहे, तर दुसरीकडे रिअल्टी शेअर्स या क्षेत्रातील बांधकाम आणि विकास कामांशी जोडलेले आहेत. म्हणूनच, शेअर बाजारात नोंदणीकृत रिअल इस्टेट हा गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्राशी जोडले जाण्याचा एक नवा आणि सोपा पर्याय ठरतो. मोतीलाल ओसवाल निफ्टी रिट्स अँड रियल्टी इंडेक्स फंड (Motilal Oswal Nifty RIETs & Realty Index Fund) हा पारदर्शक आणि इंडेक्सवर आधारित पद्धतीद्वारे या दोन्ही घटकांमध्ये एकाच वेळी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो.

हा मूळ इंडेक्स एनएसईवर नोंदणीकृत असलेले रीट आणि पात्र रिअल्टी शेअर्स एकत्र करून तयार करण्यात आला आहे. त्यांचे प्रमाण हे कंपन्यांच्या फ्री-फ्लोट बाजार मूल्यावर ठरवले जाते, ज्यामध्ये रीटचा वाटा किमान 60% किंवा त्याहून अधिक असतो. तसेच कोणत्याही एका शेअरचा वाटा जास्तीत जास्त 15% आणि एका प्रवर्तक समूहाचा वाटा 32% पर्यंत मर्यादित ठेवला असून, इंडेक्समध्ये जास्तीत जास्त 15 कंपन्यांचा समावेश असू शकतो. इंडेक्सच्या नियमांनुसार दर तीन महिन्यांनी म्हणजेच तिमाही आधारावर याचा आढावा घेऊन फेररचना केली जाते. रीट आणि रिअल्टी शेअर्स हे एकाच रिअल इस्टेट चक्राचे दोन वेगळी इंजिने मानले जातात.

रीट- म्हणजेच एकप्रकारे 'घरमालक'- हे पूर्ण तयार झालेल्या आणि भाड्याचे नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या इमारतींचे मालक असतात. नियमांनुसार त्यांना आपल्या निव्वळ वाटपयोग्य नफ्यातील किमान 90% हिस्सा गुंतवणूकदारांना देणे बंधनकारक असते. तर दुसऱ्या बाजूला रिअल्टी कंपन्या- म्हणजेच 'बिल्डर्स'- हे नवीन प्रकल्प उभारणे आणि त्यांची विक्री करण्याचे काम करतात. त्यांचा नफा हा प्रकल्पांची घोषणा, बुकिंग आणि ग्राहकांना प्रत्यक्ष ताबा मिळण्याच्या टप्प्यांवर मोठ्या रकमेच्या स्वरूपात येतो. या दोन्ही घटकांना एकाच इंडेक्समध्ये एकत्र आणून, हा फंड नियमांवर चालणाऱ्या पद्धतीद्वारे नोंदणीकृत कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा समतोल मार्ग उपलब्ध करून देतो. “पाच घरमालक, दहा बिल्डर्स, एकच परडी” ही संकल्पना या इंडेक्सची रचना अचूकपणे स्पष्ट करते, ज्यामध्ये 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 5 रीट आणि 10 रिअल्टी कंपन्यांचा समावेश आहे.

मोतीलाल ओसवाल एएमसीच्या संशोधनानुसार, निफ्टी रिट्स अँड रियल्टी टोटल रिटर्न इंडेक्सने गेल्या 5 वर्षांत दरवर्षी सरासरी अंदाजे 17.29% इतका परतावा दिला आहे. याउलट याच काळात निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्सने सुमारे 8.32% परतावा दिला आहे; तर चढ-उताराचा विचार केला तर हा इंडेक्स मुख्य बाजाराच्या बरोबरीनेच राहिला आहे. भारतात शेअर बाजारात नोंदणीकृत रिअल इस्टेट क्षेत्र अजूनही अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. सध्याच्या घडीला रीटसाठी पात्र असलेल्या दर्जेदार 'ए-ग्रेड' व्यावसायिक कार्यालयांपैकी केवळ 32% मालमत्ताच शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. याचाच अर्थ, भविष्यात अधिकाधिक रिअल इस्टेट मालमत्ता बाजारात सूचिबद्ध होतील, तसतशी या क्षेत्रात पुढील वाढीसाठी मोठी संधी आणि मोठा वाव उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande