
मुंबई, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये सत्या आणि मंजू यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जोडीला महाराष्ट्रातील सर्वच वयोगटातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असून, सत्या-मंजूच्या लग्नाची चाहत्यांमध्येही विशेष उत्सुकता आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची खास आठवण या लग्नसोहळ्यात जपली जाणार आहे. हा लग्नसोहळा येत्या २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ व रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.
सत्या-मंजूच्या लग्नातील खास अंतरपाटासाठी साताऱ्यातील समता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे आशीर्वाद रुपी उमटले. त्यामुळे मालिकेतील या लग्नसोहळ्याला केवळ प्रेक्षकांचं प्रेमच नाही, तर ज्येष्ठांचे आशीर्वादही लाभणार आहेत. आपल्या लाडक्या सत्या-मंजूला आशीर्वाद देताना वृद्धांनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
सत्याची भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदम याबद्दल सांगताना म्हणाला, “महाराष्ट्रातून सत्या-मंजू या जोडीला मिळणारं प्रेम खरंच अभूतपूर्व आहे. विशेष म्हणजे आमच्या मालिकेवर आणि या दोन्ही पात्रांवर ज्येष्ठ प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे. एक कलाकार म्हणून त्यांचं हे प्रेम प्रत्यक्ष अनुभवताना मन भरून येतं. सत्या आणि मंजूचं लग्न धूमधडाक्यात व्हावं, त्यांनी एकत्र यावं, अशी आमच्या चाहत्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर हे लग्न एका खास पद्धतीने पार पडत आहे.”
तो पुढे म्हणाला की, “या लग्नातील सर्वात खास गोष्ट म्हणजे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हातांचे ठसे या लग्नाच्या अंतरपाटावर असणार आहेत. आमच्यासाठी हे फक्त हातांचे ठसे नसून आमच्या जोडीला व संपूर्ण टीमला मिळालेला आशीर्वाद आहे. पडद्यावर सत्या-मंजूचं लग्न होत असलं तरी या लग्नात आमच्या प्रेक्षकांचाही एक सुंदर सहभाग आहे, ही भावना खूप खास आहे. लग्नातील आमचे लुक देखील आकर्षक आहेत. मुळात मालिका विश्वात पहिल्यांदा नवरी लेहेंगा परिधान करून लग्नाच्या मंडपात दिसणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर