
आगामी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार महत्वाचा बदल
नवी दिल्ली,26 सप्टेंबर (हिं.स.) : देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, एलपीजी सिलिंडरवर मिळणाऱ्या सरकारी सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (बीएए) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीत बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांची गॅस सिलिंडर बुकिंग किंवा पुरवठा बंद केला जाणार नाही. मात्र, त्यांना सरकारकडून मिळणारी सब्सिडी मिळणार नाही. अशा ग्राहकांना रिफिल सिलिंडर बाजारभावाने, म्हणजेच पूर्ण किमतीत खरेदी करावा लागेल.आगामी 1 ऑक्टोबरपूर्वी बायोमेट्रिक सत्यापन पूर्ण न केल्यास प्रति सिलिंडर मिळणारी 210 रुपयांची अप्रत्यक्ष सब्सिडी बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सब्सिडी बंद झाली तरी गॅस बुकिंग आणि घरपोच वितरणाची सेवा सुरू राहणार आहे.
बनावट आणि दुहेरी कनेक्शनवर कारवाई
नव्या प्रमाणीकरण प्रक्रियेमुळे एकाच नावावर असलेली बनावट, दुहेरी किंवा अपात्र गॅस कनेक्शन ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच, घरगुती वापरासाठी सब्सिडीच्या दरात मिळणाऱ्या सिलिंडरचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा औद्योगिक क्षेत्रात होणारा बेकायदा व्यावसायिक वापर रोखण्यास मदत होणार आहे.पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाचा मुख्य उद्देश सब्सिडीचा गैरवापर रोखणे आणि त्याचा लाभ केवळ पात्र व वास्तविक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
तब्बल 27.43 कोटी ग्राहकांचे प्रमाणीकरण पूर्ण
ज्या ग्राहकांनी यापूर्वीच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 19 सप्टेंबरपर्यंत देशातील सुमारे 27.43 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.हा नियम केवळ ज्या ग्राहकांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी लागू आहे.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण कसे कराल ?
ग्राहकांना प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत:
सिलिंडर वितरणाच्या वेळी : गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या उपकरणाद्वारे अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा देऊन तत्काळ बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल.
गॅस एजन्सीमध्ये जाऊन : संबंधित इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन आधार प्रमाणीकरण करता येईल.
मोबाइल ऍपद्वारे : इंडियनऑइल ONE, HelloBPCL किंवा HP PAY यांसारख्या संबंधित तेल कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल ऍपद्वारे घरबसल्या प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
एलपीजी कंपन्यांचे बुकिंग क्रमांक इंडेन गॅस
IVRS / रिफिल बुकिंग : 7718955555
मिस्ड-कॉल बुकिंग : 8454955555
व्हॉट्सऍप बुकिंग : 7588888824 — नोंदणीकृत क्रमांकावरून ‘REFILL’ असा संदेश पाठवावा.
टोल-फ्री हेल्पलाइन : 1800-2333-555
भारत गॅस
रिफिल बुकिंग : 7715012345 / 7718012345
मिस्ड-कॉल बुकिंग : 7710955555
टोल-फ्री हेल्पलाइन : 1800-22-4344
एचपी गॅस
HP Anytime / रिफिल बुकिंग : 9493602222
मिस्ड-कॉल बुकिंग : 9493602222
टोल-फ्री हेल्पलाइन : 1800-233-3555
बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी दोन महत्त्वाचे नियम
गॅस सिलिंडरची बुकिंग केवळ गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकावरूनच स्वीकारली जाईल. नोंदणीकृत क्रमांकाव्यतिरिक्त अन्य क्रमांकावरून मिस्ड कॉल किंवा एसएमएस केल्यास बुकिंग स्वीकारले जाणार नाही.सिलिंडर बुक केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 4 किंवा 6 अंकी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) पाठवला जातो. डिलिव्हरी कर्मचारी सिलिंडर घेऊन घरी आल्यानंतर हा कोड त्याला सांगणे आवश्यक आहे. कर्मचारी आपल्या ऍपमध्ये कोड नोंदवल्यानंतरच सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण झाल्याचे मानले जाते.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी