पंतप्रधानांकडील स्मृतीचिन्हांच्या इ-लिलावामध्ये महाराष्ट्रातील वारसा, कला व समकालिन यशचिन्हांचा समावेश
* 89 स्मृतीचिन्हांच्या संग्रहामध्ये महाराष्ट्राच्या यशोचिन्हांचे दर्शन नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक परंपरा, स्वदेशी कला व समकालीन यशोचिन्हांना पंतप्रधानांकडील स्मृतीचिन्हांच्या इ लिलाव 2026 म
यश चिन्ह


* 89 स्मृतीचिन्हांच्या संग्रहामध्ये महाराष्ट्राच्या यशोचिन्हांचे दर्शन

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.) -

महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक परंपरा, स्वदेशी कला व समकालीन यशोचिन्हांना पंतप्रधानांकडील स्मृतीचिन्हांच्या इ लिलाव 2026 मध्ये स्थान मिळाले आहे. या संग्रहात शिल्पे, चित्रे, कलात्मक वस्तू, स्मारक वस्तू, धार्मिक कलाप्रकार, क्रीडा क्षेत्रातील स्मृतीचिन्हे आणि प्रारुपे राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परिप्रेक्ष्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ही या संपूर्ण संग्रहाची मुख्य संकल्पना आहे. अनेक स्मृतीचिन्हांमध्ये महाराजांची प्रतिमा विविध रुपात व विविध कलाप्रकारांमध्ये घडवण्यात आली आहे. यामध्ये अश्वारुढ, सिंहासनावर बसलेले, सिंहाशेजारचे आणि समारंभातील अशी महाराजांची विविध रुपे दर्शविणाऱ्या पुतळ्यांचा समावेश आहे.

या संग्रहामध्ये चांदीची मूर्ती, लाकडात कोरलेले व्यक्तीचित्र, कलाकारांनी रंगविलेले व्यक्तीचित्र आणि रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती यांचाही समावेश आहे.

वीणेसह संत तुकारामांची प्रतिमा, संत ज्ञानेश्वरांची ध्यानस्थ मुद्रा दर्शवणारी प्रतिमा यांच्यासह महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचे दर्शन घडवणारे अनेक कलाप्रकार यात पाहायला मिळतात.

वारलीसह राज्यातील विविध चित्रशैलींचा यात समावेश आहे. एकाच चौकटीत असलेल्या एका चित्रात वारली भरतकामामधून आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे आणि दुसऱ्या चित्रात वारली कलाप्रकारातील अनोख्या भौमितीक रचनांमधून ग्रामीण जीवनशैली, शेती, सण व परंपरा यांचे दर्शन घडते. गडद तपकिरी रंगाच्या कापडावरील हाताने रंगविलेली वारली चित्रे आणि अन्य चित्रांमधून या पारंपरिक कलेतील वैविध्य पाहायला मिळते.

या संग्रहात वारसा व आध्यात्मिक कलाकृतींबरोबरच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचे यश पाहायला मिळते. दिव्यांग बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांची स्वाक्षरी असलेले बॅडमिंटन रॅकेट आणि 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिन खिलारी यांची बॅग व गोळाफेक स्पर्धेतील गोळा या त्यातील काही उल्लेखनीय वस्तू आहेत.

काही स्मृतीचिन्हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व उल्लेखनीय संस्था दर्शवितात. यामध्ये वाढवण बंदर, ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अहिल्याबाई होळकर आणि पहिले बाजीराव पेशवे यांची चित्रे व पुतळे यांसारखी भारताचा सामाजिक व बौद्धिक वारसा दाखवणारी स्मृतीचिन्हे या संग्रहाचा महत्त्वाचा भाग आहेत.

या सर्व 89 स्मृतिचिन्हांमधून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, आध्यात्मिक परंपरा, लोककला, धार्मिक वास्तुरचना, क्रीडानैपुण्य व आधुनिक पायाभूत सुविधा यासारखी महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दिसून येतात. हाताने तयार केलेल्या वारली प्रकारातील वस्तू आणि आध्यात्मिक शिल्पे ते संस्थांच्या प्रतिकृती आणि क्रीडानैपुण्याची प्रतीके अशा व्यापक संग्रहातून महाराष्ट्राच्या वारशाचे विविध पैलूंचे प्रतिनिधित्व हा संग्रह करतो आणि राज्याच्या यशाला प्रतीकात्मक ओळख लाभते.

पंतप्रधानांकडील स्मृतीचिन्हांच्या लिलावाचे हे ८ वे वर्ष असून हा लिलाव 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहील. लिलावाच्या तारखा, सहभागी होण्याचे तपशील आणि स्मृतीचिन्हांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी पंतप्रधान स्मृतीचिन्हांच्या इ लिलावाच्या pmmementos.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande