
* भव्य मिरवणुकीने गणरायास निरोप, दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.)
: राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात १४ सप्टेंबरपासून उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची काल दिमाखात सांगता झाली. रात्री श्री गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. या उत्सवादरम्यान राजधानी दिल्लीमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे परिपूर्ण दर्शन घडले.
विसर्जनाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात जुन्या महाराष्ट्र सदनातून झाली. विसर्जनापूर्वी निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. आरतीनंतर झांज पथक, ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जुन्या महाराष्ट्र सदनातून नव्या महाराष्ट्र सदनापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत दिल्लीतील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या तालावर उत्साहाने सहभागी झालेल्या भक्तांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला. मिरवणूक महाराष्ट्र सदनात पोहोचल्यानंतर गणेशभक्तांनी श्रींचे दर्शन घेतले आणि विहित धार्मिक विधींनुसार श्रींच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
या बारा दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. १४ सप्टेंबर रोजी श्रींची प्राणप्रतिष्ठा, आगमन मिरवणूक आणि भजनाचा कार्यक्रम झाला. याशिवाय आकाशवाणी रंगभवन तसेच जुन्या महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक, नितीन सरकटे हंसराज यांची लाईव्ह कॉन्सर्ट, वैभव जोशी व संदीप खरे यांचा ‘मराठी चित्रपट गीते’ कार्यक्रम, संतोष भांगरे यांचा ‘महाराष्ट्राची लोककला’, गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा गझल कार्यक्रम तसेच वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या गायन कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भरतनाट्यम, लावणी, ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘बॉली बीट्स’ यांसारख्या कार्यक्रमांनीही उत्सवाची रंगत वाढवली. १९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी व उकडीचे मोदक यांचे लाईव्ह स्टॉल, ‘कौशल्याला सलाम!’ अंतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या कलावस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा!’ या उपक्रमातून पैठणी, इंदुरी, माहेश्वरी, इरकल साड्या आणि हस्तमाग वस्तूंची मांडणी करण्यात आली. विविध स्टॉल्समुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंचा अनुभव घेता आला.
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी सर्व नागरिक, कलाकार, स्वयंसेवक, संस्था आणि आयोजन समितीचे आभार मानले. दिल्लीतील नागरिक व महाराष्ट्रप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव भक्ती, कला, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा सुंदर संगम ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी