
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी विश्वास व्यक्त केला की, भारत १० टक्क्यांहून अधिक आर्थिक विकासदर साध्य करू शकतो. यासोबतच त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.
सीतारमण यांनी बंगळूर येथे आयआयटी मद्रास एलुमनाई असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फायरसाइड चॅटमध्ये हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, अधिक आर्थिक विकासामुळे देशाच्या आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या प्रवासाला वेग देण्यास मदत होईल. मात्र, यासाठी सर्व घटकांकडून ‘खूप मोठ्या प्रयत्नांची’ गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्र्यांनी सांगितले, “१० टक्क्यांहून अधिक विकासदर साध्य करणे शक्य आहे आणि मी हे केवळ तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सांगत नाही. हे प्रत्यक्षात शक्य आहे.”
मद्रास एलुमनाई असोसिएशनच्या ‘संगम २०२६’ कार्यक्रमात प्रा. राजीव श्रीनिवासन यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी २०१५ नंतर स्टार्टअपच्या झालेल्या वेगवान विस्ताराचा उल्लेख केला. आगामी काळात स्टार्टअप अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. सीतारमण म्हणाल्या, “आपल्याकडे नकारात्मक बोलणाऱ्यांची कमतरता नाही. असे अनेक लोक आहेत, ज्यांना भारत अपयशी ठरल्यास अप्रत्यक्षपणे आनंद होतो. आपण हे अजिबात सहन करू शकत नाही. अशा लोकांना सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरित करण्याची गरज आहे.”
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, तांत्रिक हस्तक्षेपांमुळे उत्पादकांना बाजारपेठेशी जोडण्यास आणि उत्पादकता वाढविण्यास मदत झाली आहे. पीक कापणीचा वेग वाढविणे आणि पुढील पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
अर्थमंत्र्यांनी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमातील संवादादरम्यान, ज्या भूखंडांचे यापूर्वी केवळ हाताने सर्वेक्षण केले जात होते, त्यांच्या अचूक नकाशांकनासाठी ड्रोनच्या वापराचा उल्लेख केला. त्या पुढे म्हणाल्या, “तंत्रज्ञानाच्या या वेगवान प्रसारासोबतच स्टार्टअपमधील नवोन्मेष प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”
अर्थमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, सीतारमण यांनी बंगळुरूमध्ये आयआयटी मद्रास एलुमनाय असोसिएशनच्या ‘संगम २०२६’ कार्यक्रमात प्रा. राजीव श्रीनिवासन यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अन्य मान्यवरांसोबत ‘आयआयटीएम युनिकॉर्न फ्रंटियर फंड-१’चे उद्घाटन केले. हा एक अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) असून, याची सुरुवात युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्स (यूआयव्ही) आणि आयआयटी मद्रास/आयआयटीएम रिसर्च पार्क यांनी संयुक्तपणे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule