बीड : बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंकजा मुंडेंचा दिलासा
बीड, 26 सप्टेंबर (हिं.स.)परळी वैजनाथ तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी लिंबोटा आणि पांगरी शिवारातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर
पंकजा मुंडे


बीड, 26 सप्टेंबर (हिं.स.)परळी वैजनाथ तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी लिंबोटा आणि पांगरी शिवारातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तूर, सोयाबीन, कापूस यांसह विविध पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके हाताशी आलेली असतानाच पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व नुकसानीची माहिती पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडली. पिकांचे झालेले नुकसान, पावसाची कमतरता आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की,कमी पावसामुळे पिके वाया गेली असली तरी कोणीही धीर सोडू नका. हे सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि भरीव मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी मराठवाड्याचीच लेक असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते. शेतकऱ्यांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे नुकसान झाले आहे, त्यांना त्यानुसार मदत देण्यात येईल. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकारने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता या दुष्काळग्रस्त भागामध्ये राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनतेला मदत करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पीक कर्जांचे पुनर्गठण, जमीन महसूलात सवलत, शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी, वीज पंपांच्या बिलात सवलत, जलसंधारणाच्या कामांना गती, दुष्काळामुळे वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे यासारखी कामे केली जाणार आहेत .हे बळीराजाचे सरकार आहे. त्यामुळे बळीराजाला वाऱ्यावर न सोडता सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande