
ठाणे, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 10281 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 281 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये 6867 तर, विशेष टाकी व्यवस्थेत 1622 मूर्ती स्विकृती केंद्रात 26, फिरती विसर्जन व्यवस्था 11 तर खाडीघाट येथे 1745 गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले.
दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर आयुक्त सौरभ यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. विसर्जन व्यवस्था ठिकाणी अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त 2, मेजर डॉ. नितीन राठोड, सर्व उपायुक्त, सर्व सहायक आयुक्तांनी त्या त्या प्रभाग समितीतील घाटांवर उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला गणेश भक्तांचे सहकार्याबद्दल आभारही मानले.
उथळसर प्रभाग समितीत 209, नौपाडा कोपरी येथे 832, कळवा येथे 1379, दिवा येथे 947, मुंब्रा येथे 202, माजिवडा मानपाडा येथे 2971, लोकमान्य सावरकर नगर येथे 72, वागळे येथे 2482, वर्तकनगर येथे 1187 असे एकूण 10281 मूर्तीचे विसर्जन अनंतचतुदर्शी दिवशी करण्यात आले.
अनंतचर्तुदर्शी दिवशी सर्व विसर्जन घाटावर मिळून एकूण 11 हजार 200 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. तर संपूर्ण गणेशोत्सव काळात एकूण 61 हजार किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. दरम्यान संकलित झालेल्या निर्माल्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
अनंत चर्तुदर्शी दिवशी विर्सजनाची आकडेवारी
(विर्सजन स्थळ - गणेश मूर्तींची संख्या)
कृत्रिम तलाव - 6867
विसर्जन घाट - 1745
विशेष टाकी व्यवस्था – 1622
मूर्ती स्विकृती केंद्र – 36
फिरती विसर्जन व्यवस्था - 11
एकूण - 10281
संपूर्ण गणेशोत्सव काळातील विसर्जन आकडेवारी
ठाणे महापालिका क्षेत्रात दीड, पाच, गौरी गणपती, सात व अनंतचतुदर्शी या सर्व दिवशी मिळून एकूण 59722 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये टाकी विसर्जन व्यवस्थेमध्ये 12586, मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये 611, फिरती विसर्जन 183, कृत्रिम तलाव 38284, खाडीघाट 8058 असे एकूण 59722 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर