
मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत कडक आदेश दिले असतानाही यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी मुंबईतील विविध भागांत झालेल्या विसर्जन मिरवणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली. आवाज फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनिवर्धकांचा वापर काही प्रमाणात कमी झाला असला, तरी राजकीय पक्षांच्या बूथवर लावण्यात आलेले ध्वनिवर्धक, बँजो आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे अनेक ठिकाणी ध्वनी पातळीने धोकादायक मर्यादा ओलांडली.
मुंबईतील विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वाधिक १०७.८ डेसिबल आवाजाची नोंद वांद्रे पश्चिम परिसरात झाली. २५ सप्टेंबर रोजी रात्री १०.०३ वाजता ध्वनिवर्धकासह बँजो वाजवला जात असताना येथे ९१ ते १०७.८ डेसिबल ध्वनी पातळी नोंदवण्यात आली. याच दिवशी रात्री १०.२८ वाजता वरळी परिसरात ध्वनिवर्धकाशिवाय ढोल-ताशांच्या गजरात ९४ ते १०७ डेसिबल आवाजाची नोंद झाली. त्यामुळे केवळ ध्वनिवर्धकच नव्हे, तर पारंपरिक वाद्यांच्या वाढत्या आवाजामुळेही ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आवाज फाउंडेशनच्या नोंदीनुसार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४.४१ वाजता गिरगाव चौपाटीवरील राजकीय पक्षाच्या बूथवर ध्वनिवर्धकाचा वापर सुरू असताना ८०.४ ते ९१.४ डेसिबल आवाज नोंदवला गेला. सायंकाळी ५.०५ वाजता ऑपेरा हाऊस जंक्शन येथे जनरेटर आणि ध्वनिवर्धकाशिवाय असलेल्या मिरवणुकीतही ९०.३ ते ९६.१ डेसिबल आवाजाची नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी ५.२८ वाजता याच परिसरात ध्वनिवर्धकाशिवाय निघालेल्या मिरवणुकीत ८६ ते ९३.७ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला.
रात्री ११.१५ वाजता गिरगाव चौपाटीवरील राजकीय पक्षाच्या बूथवर ध्वनिवर्धकावर संगीत सुरू असताना ९२ ते १०३ डेसिबल ध्वनी पातळी गाठली. २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतरही ध्वनी प्रदूषण थांबले नाही. रात्री १२.०६ वाजता ऑपेरा हाऊस येथे ध्वनिवर्धकाशिवाय सुरू असलेल्या मिरवणुकीत ८४.९ ते ८७ डेसिबल आवाज नोंदवला गेला. मध्यरात्री १२.१८ वाजता गिरगाव चौपाटीवरील राजकीय बूथवर ८७ ते ९४ डेसिबल, तर रात्री १२.३० वाजता याच ठिकाणी ८२ ते ९० डेसिबल आवाजाची नोंद झाली.
मुंबई उच्च न्यायालयाने २०२६ मध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर स्वतःहून प्रकरण हाती घेत कडक निर्देश दिले होते. मात्र, या आदेशांनंतरही मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धकांवर संगीत सुरू असल्याचे आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांचे डेसिबल मीटर फारसे दिसून आले नाहीत. काही ठिकाणी डेसिबल मीटर टॉवरवर बसवण्यात आले होते; मात्र हे टॉवर मुख्य वाद्ये वाजवली जात असलेल्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आवाज फाउंडेशन ही २००३ पासून भारतातील ध्वनी प्रदूषणाविरोधात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये मुसळधार पावसामुळे ध्वनी पातळीची अचूक नोंद घेता आली नव्हती. तर २०२४ मध्ये ऑपेरा हाऊस येथे सर्वाधिक ११५ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. यंदा बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी मुख्य मिरवणुकीतून ध्वनिवर्धक हटवले, ही सकारात्मक बाब असली तरी ड्रम आणि बँजोचा आवाज वाढवण्यासाठी तसेच राजकीय पक्षांच्या व्यासपीठांवर ध्वनिवर्धकांचा वापर झाल्याने ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न कायम असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule