रत्नागिरी परिसरातील १३ समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता अभियानात १५ टन कच-याचे संकलन
रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं.स.) । आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील १३ समुद्रकिनाऱ्यांवर राबविण्यात आलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानातून १५ टन
किनारा स्वच्छता अभियान


रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं.स.) । आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील १३ समुद्रकिनाऱ्यांवर राबविण्यात आलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानातून १५ टन कचरा संकलित करण्यात आला.

विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय विभाग, उद्योग, व्यापारी, मच्छिमार संस्था, स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या अभियानात एकूण ८८० जण सहभागी झाले. त्यांनी २५६ पिशव्यांमध्ये १५ टनांहून अधिक कचरा संकलित करण्यात आला.

रत्नागिरी शहरातील मांडवी व पांढरा समुद्र, तालुक्यातील नांदिवडे, संदखोल, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, वेत्ये, कशेळी आणि नाटे या समुद्रकिनाऱ्यांवर अभियान राबविण्यात आले.

अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर विविध किनाऱ्यावर निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. या अभियानादरम्यान हा कचरा संकलित करून किनारा स्वच्छ करण्यात आला. मांडवी व पांढरा समुद्र येथे कचरा संकलित करण्यात आला असून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तो वाहनाद्वारे वाहून नेला.

अभियानात रत्नागिरी नगरपालिका, विविध ग्रामपंचायती, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, वन विभाग, कांदळवन कक्ष, आरोग्य विभाग, अंगणवाडी, सागरी पोलीस तसेच सागरी जीवशास्त्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

शैक्षणिक क्षेत्रातून मालगुंडमधील ब. प. विद्यालय, नाटे हायस्कूल, विविध ग्रामीण मराठी शाळा, यश फाउंडेशन, फाटक हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, गोगटे-जोगळेकर कॉलेज, अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, भारत शिक्षण संस्थेचे सिनियर कॉलेज आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. वरवडे येथील मच्छिमार सोसायटी, जिजामाता ग्रामसंघ (मालगुंड), विविध बचत गट, तंटामुक्ती समिती (नाटे), कर्तव्य प्रतिष्ठान (आडिवरे), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, लायन्स क्लब (हातखंबा), रिलायन्स फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा सहभाग होता.

जिंदाल, योमन मरीन व गद्रे मरीन या कंपन्यांनीही सहकार्य केले, तर मरीन सिंडिकेटकडून विशेष सहाय्य मिळाले.

सागरी सीमा मंचाने जयगड ते आंबोळगड या किनारपट्टीवरील रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजन केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande