
रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
कर्जत तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, स्थानिक शेतकरी व आदिवासी बांधवांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचे दलाल सक्रिय झाले असून ते इन्व्हेस्टरच्या माध्यमातून आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आमदार थोरवे म्हणाले की, गेल्या वर्षभरात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. मात्र, या प्रकल्पांच्या नावाखाली दलालांची टोळी सक्रिय झाली आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना आणि आदिवासी बांधवांना शासनाकडून किंवा संबंधित प्रकल्पाकडून समाधानकारक व योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण एकाही प्रकल्पाला परवानगी देणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे नागरिकांनी आपली एक गुंठाही जागा कोणालाही विकू नये, अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.
यावेळी त्यांनी भूतकाळातील कोंढाणे धरणाचा दाखला दिला. कोंढाणे धरणामध्ये गोरगरीब आदिवासी बांधवांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आदिवासी बांधवांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या जमिनी स्वतःच्या हस्तकांच्या नावावर करून घेतल्या आणि प्रति एकर सव्वा कोटी रुपयांचा मोबदला लाटून तो पैसा निवडणुकीत वापरला, असा थेट आरोप थोरवे यांनी केला. यामुळे आदिवासी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले असून तीच पुनरावृत्ती या नवीन प्रकल्पांमध्ये होऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.
गावे उठवली जाणार असल्याची खोटी अफवा पसरवली जात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगत जोपर्यंत शासन चर्चा करत नाही तोपर्यंत तुमचा आमदार तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, असा विश्वास त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)