
रत्नागिरी, 27 सप्टेंबर (हिं.स.) । देवरूख येथील प्रतियश शेतकरी मदन मोडक व शेती तज्ज्ञ हेमंत तांबे यांच्या संकल्पनेतून कुडवली (ता. संगमेश्वर) येथील सांदीपनी गुरुकुल संस्थेच्या जागेत ६२०० वृक्षांच्या जंगलाची निर्मिती करण्यात आली.
सांदीपनी गुरुकुल संस्थेचे विश्वस्त महेश आरस व सुनीता महेश आरस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या पूर्ततेचा समारंभ करण्यात आला. यावेळी वृक्षप्रेमी व दानशूर व्यक्ती मदन मोडक, सौ. मोडक, शेती तज्ज्ञ हेमंत तांबे, युयुत्सु आर्ते, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, देवरूख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, नगरसेवक रूपेश भागवत, शामकांत अळवणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मदन मोडक यांनी संकल्पनेची माहिती देताना सांगितले की आपल्या परिसरामध्ये एकूणच आपल्या जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, बेसुमार झाडे तोडली जातात. यामुळे आपल्याभोवतालचे सगळे डोंगर उघडे बोडके होत आहेत. त्याचा हवामानावर, पावसावर वाईट परिणाम होत आहे. वृक्षतोड थांबविता येत नसली, तरी जेथे शेतकरी जागेचे मालक आपणहून पैशाच्या लालसेने झाडे तोडतात. यावर उपाय म्हणून आपण जास्तीत जास्त नवीन रोपे लावायची, नवीन वृक्ष लावायचे आणि हे एक व्रत म्हणून स्वीकारायचे, या उद्देशाने दरवर्षी जमतील तेवढी झाडे लावत राहायची, असा संकल्प मदन मोडक व हेमंत तांबे यांनी केला. पण लागवडीकरिता जागा मिळत नव्हती. मिळालेली जागा खूप डोंगरउतार असलेली आणि वृक्ष लागवड होणार नाही अशी होती. याच दरम्यान सांदीपनी गुरुकुल संस्थेने संस्थेच्या जागेवर वृक्षारोपणाची परवानगी दिली. त्यानुसार गेल्या मार्चपासून वृक्ष लागवड सुरू झाली. आतापर्यंत ६२०० झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली.
हेमंत तांबे गेली चार-पाच वर्षे समाजाकरिता व शेतकऱ्यांकरिता कोकणात होणारी फळझाडे आणि जंगलनिर्मितीला आवश्यक असलेली अनेक झाडे विनामूल्य लोकांना देत आहेत. दरवर्षी सुमारे ५० हजार झाडे या पद्धतीने लावण्यात आली. कुडवलीतील प्रकल्पाकरिता रोपे तयार करणे, ती वाढवणे, खड्डे खोदून लागवड करणे याकरिता पदरमोड करून सहा लाख रुपये खर्च करण्यात आला.
लावलेली झाडे प्रामुख्याने रायवळ, आंबा, जांभूळ, कोकम, फणस, बकुळ आणि वड, पिंपळ, बहावा, शिवण इत्यादी जंगली अशा बारा प्रकारची झाडे लावण्यात आली. ही झाडे लावताना गुरुकुलच्या आवारात किंवा डोंगरातील जुन्या झाडांना धक्का न लावता उरलेल्या जागेमध्ये झाडे लावल्याचे मोडक यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी