
अहमदाबाद, 27 सप्टेंबर (हिं.स.)केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात 1,472 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात झाले. यावेळी शाह यांनी देशातील पहिल्या एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर (LNG) चालणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवानाही केली. रेल्वे गाड्यांच्या WAG-12 इंजिनांच्या देखभालीसाठी उभारलेल्या केंद्राचेही शाह यांनी उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केले. आज साबरमती विभागाअंतर्गत पर्यावरणीय शाश्वतता, प्रवासी सुविधा आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षेवर भर असलेल्या अनेक रेल्वे प्रकल्पांचा प्रारंभ केला असल्याची माहिती त्यांनी दिली. साबरमती ही सत्याग्रह, साधे राहणीमान, ग्रामविकास आणि खादी असे सर्व प्रयोग प्रत्यक्ष अमलात आणणारी भूमी आहे असे ते म्हणाले.
12,000 अश्वशक्तीच्या ट्विन-सेक्शन क्षमतेचे इंजिन प्रत्यक्ष वापरात आणले असल्याचेही त्यांनी सांगितले. या इंजिनामुळे एकाच वेळी तब्बल 600 ट्रकइतक्या मालाची वाहतूक केली जाऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी अशा कामासाठी दोन इंजिनांची आवश्यकता असायची, परंतु आता एकच WAG-12 इंजिन हे काम करू शकते असे ते म्हणाले. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे ते म्हणाले. आजपासून प्रत्यक्षात धावू लागलेली एलएनजीवर आधारीत रेल्वे गाडी आगामी काळात पर्यावरण संवर्धनात अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल ही बाबही त्यांनी नमूद केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे