
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा ऑक्टोबर महिन्यात दसरा, तर नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांकडून एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, यंदा सणांच्या आधीच ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो. एक ऑक्टोबर २०२६ पासून एसी, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून विविध कारणांमुळे दरवाढीची तयारी करण्यात आली आहे. धातूंच्या किमतीत झालेली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च तसेच आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती यामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी ग्राहकांवर या वाढलेल्या खर्चाचा काही भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एक ऑक्टोबरपासून होणारी दरवाढ ही चालू वर्षातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीतील तिसरी वाढ ठरणार आहे. तांबे, अॅल्युमिनिअम आणि कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याने कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे. त्यातच वाहतूक खर्च वाढल्याने कंपन्यांना उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.
एक ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत साधारण तीन ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. एसीच्या किमतीत पाच ते आठ टक्क्यांची वाढ होऊ शकते. तर वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एलईडी टीव्हीच्या किमती तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी नियोजन करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डाइकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्स यांसारख्या प्रमुख इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून चार ते दहा टक्क्यांपर्यंत दरवाढ लागू करण्यात आली आहे. एलजी आणि बॉश होम कम्फर्टने एसीच्या किमतीत पाच टक्क्यांची वाढ केली आहे. पॅनासोनिककडूनही दरवाढीचा आढावा घेतला जात आहे.
ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे विविध वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, जीएसटीतील बदलांमुळे ग्राहकांवर प्रत्यक्षात सुमारे पाच टक्के दरवाढीचा परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. गोदरेज एंटरप्रायझेस, हायर इंडिया आणि डाइकिन यांनीही दरवाढीला दुजोरा दिला असून, त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत दोन ते सात टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule