
नागपूर, 27 सप्टेंबर, (हिं.स.) : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पसमधील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्राचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत त्याचे लोकार्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज होणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना मोठा लाभ मिळणार असून, दंत शिक्षण व संशोधनालाही नवी दिशा मिळणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर ही संस्था 1968 पासून कार्यरत आहे. विदर्भ आणि मध्य भारतातून मोठ्या संख्येने दंत रुग्ण या संस्थेत उपचारासाठी येतात. दररोज किमान 500 रुग्ण या संस्थेच्या आरोग्यसेवेचा लाभ घेतात. अशा महत्त्वपूर्ण संस्थेत अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
4,770 चौ. मीटर क्षेत्रफळात अत्याधुनिक केंद्र
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 22,002 चौ. फूट जागेचे संपादन करण्यात आले असून, केंद्राचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 4,770.12 चौ. मीटर आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, बांधकामाच्या गुणवत्तेसाठी आणि नियोजनासाठी तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन 4 जानेवारी 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.
80 टक्के काम पूर्ण
या केंद्राच्या इमारतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. विद्युतविषयक कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे. केंद्राच्या प्रभावी संचालनासाठी शासनाने नवीन पदांना मान्यता दिली असून काही पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 91 पदांपैकी 60 पदे भरली गेली आहेत.
अत्याधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता
केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सुमारे 3 कोटी 89 लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच राज्य योजनेअंतर्गत सुमारे 3 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
सहा नवीन अतिविशेष दंतचिकित्सा विभाग
शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर येथे अगोदरच 63 पदवी पूर्व BDS च्या जागा, 24 पदवी उत्तर एम डी एस च्या जागा आणि शिष्यवृत्ती ( Fellowship) व पदव्युत्तर (PhD )अभ्यासक्रम सुरू असून नॅक ऐ प्लस (NAAC A+ )श्रेणीकरण प्राप्त झालेली संस्था आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून आता. दंतचिकित्सेतील आधुनिक आणि विशेष उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये डिजिटल डेंटिस्ट्री, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल इम्प्लांटोलॉजी, स्पोर्ट्स डेंटिस्ट्री, क्रॅनिओफेशियल सर्जरी आणि फॉरेन्सिक ओडोंटोलॉजी या सहा नवीन विभागांचा समावेश आहे.
दंत रुग्णसेवा, शिक्षण आणि संशोधनाला चालना
अतिविशेषोपचार केंद्रामुळे जटिल दंतविकारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होण्याबरोबरच पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक दंतचिकित्सा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णसेवा, दंत शिक्षण आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांना एकाच वेळी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या दंतचिकित्सा क्षेत्राला नवी ओळख
महाराष्ट्रात सध्या चार शासकीय दंत महाविद्यालय, एक मुंबई महानगरपालिकेचे नायर दंत महाविद्यालय आणि तीस हून अधिक खासगी दंत महाविद्यालय असून, देशातील राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या दंत महाविद्यालयांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागपूर येथील अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कार्यान्वित झाल्यानंतर दंत संशोधन आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उर्वरित कामांना गती देऊन हे केंद्र निर्धारित कालावधीत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातीलच नव्हे तर मध्य भारतातील रुग्णांसाठी अत्याधुनिक अतिविशेष दंतचिकित्सा उपचारांचे महत्त्वाचे केंद्र नागपुरात उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर