राजापूर अर्बन बँकेच्या सभासदांना पुढच्या वर्षी लाभांशाचे आश्वासन
रत्नागिरी, 27 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर अर्बन बँकेच्या आज झालेल्या १०५व्या वार्षिक सभेत पुढील वर्षी सभासदांना लाभांश देण्याचे आश्वासन अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी दिले. राजापूर अर्बन बँकेने गेल्या दोन वर्षांत अनुभवलेल्या कठीण आर्थिक परिस्थितीतून
राजापूर अर्बन बँक वार्षिक सर्वसाधारण सभा


रत्नागिरी, 27 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर अर्बन बँकेच्या आज झालेल्या १०५व्या वार्षिक सभेत पुढील वर्षी सभासदांना लाभांश देण्याचे आश्वासन अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी दिले.

राजापूर अर्बन बँकेने गेल्या दोन वर्षांत अनुभवलेल्या कठीण आर्थिक परिस्थितीतून बँकेला सावरण्यासाठी सभासदांनी दाखविलेला विश्वास, तसेच संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे बँक पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मात्र बँकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी थकीत कर्जांची कठोर व प्रभावी वसुली करावी. बँकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचविणारे कृत्य करणारे कर्जदार तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी सभासदांनी केली.

बैठकीला उपाध्यक्ष विवेक गादीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, सर्व संचालक, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात अॅड. सुतार यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत बँकेच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा सभेसमोर मांडला. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, लेखापरीक्षित ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक, वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती, पोटनियम दुरुस्ती तसेच वार्षिक व दीर्घमुदती विकास आराखड्यासह विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी एकत्रितपणे काम करतील. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. बँकेच्या हिताच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही अध्यक्ष अॅड. सुतार यांनी स्पष्ट केले.

उल्हास खडपे, प्रभात पाध्ये, प्रसन्न मालपेकर, प्रमोद सुर्वे यांच्यासह अन्य सभासदांनीही चर्चेत सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. अध्यक्ष अॅड. सुतार यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देत बँकेच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande