
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.)।रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणादरम्यान भारतासोबतच्या मैत्रीचा पुरावा जगासमोर दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्थायी सदस्य म्हणून भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नवी दिल्लीची बाजू घेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याचे समर्थन केले. एवढेच नव्हे, तर सुरक्षा परिषदेत पाश्चिमात्य देशांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या प्रस्तावाविरोधातही रशियाने कडक इशारा दिला.संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) जगभरातील नेत्यांना संबोधित करताना लावरोव्ह यांनी स्पष्ट केले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोणत्याही प्रकारच्या सुधारणांमुळे परिषदेचे किंवा तिच्या स्थायी सदस्यांचे विशेषाधिकार कमी होता कामा नयेत.
रशियाची भूमिका स्पष्ट करताना लावरोव्ह यांनी सांगितले की, सुरक्षा परिषदेतील सुधारणांमध्ये पाश्चिमात्य देशांना अतिरिक्त जागा देणे टाळले पाहिजे. लावरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांमध्ये पाश्चिमात्य देशांना, विशेषतः जर्मनी आणि जपानला अतिरिक्त जागा देण्याचा समावेश नसावा, कारण हे देश आता लष्करीकरण आणि सूडाच्या भावनेच्या मार्गावर वाटचाल करत आहेत.”
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘ग्लोबल साउथ’मधील देशांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “आम्ही आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूने आहोत. स्थायी जागेसाठी ब्राझील आणि भारताच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा आहे.”तसेच आफ्रिका खंडाच्या हितांचाही विचार केला पाहिजे, यावर लावरोव्ह यांनी भर दिला. इस्रायली सहमती आणि ‘सीट’ घोषणेत नमूद केल्याप्रमाणे आफ्रिका खंडाच्या हितांचे संरक्षण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मॉरिशसनेही आपल्या भाषणातून भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला. मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफूल यांनी नवी दिल्लीच्या भूमिकेला समर्थन देताना सांगितले, “सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी आम्ही जी-४ आणि एल-६९च्या भूमिकेचे समर्थन करतो. जागतिक घडामोडींमध्ये भारताची रचनात्मक भूमिका लक्षात घेता, स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला आमचा पाठिंबा आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode