
समरकंद (उझबेकिस्तान), 27 सप्टेंबर (हिं.स.) समरकंद येथे झालेल्या ४६ व्या चेस ऑलिम्पियाड २०२६ मध्ये, दोन्ही भारतीय संघांनी दमदार कामगिरी करत 'ओपन' गटात रौप्य पदक आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकले. 'ओपन' गटात, यजमान उझबेकिस्तानने मायदेशात आपले दुसरे ऑलिम्पियाड सुवर्णपदक जिंकले आणि भारत दुसऱ्या स्थानावर राहिला. जर्मनीने कांस्य पदक जिंकून पदकांचे मानकरी ठरले.
भारताचा हंगेरीविरुद्धचा अंतिम फेरीतील सामना २-२ असा बरोबरीत सुटला; यात जागतिक विजेत्या गुकेश डोम्माराजूला हंगेरीच्या ग्रँडमास्टर ग्लेब डुडिनकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, ग्रँडमास्टर अर्जुन एरिगासीने ग्रँडमास्टर पीटर लेकोचा पराभव केल्यामुळे भारताला सामना बरोबरीत सोडवता आला आणि रौप्य पदक निश्चित करता आले.उझबेकिस्तानने अंतिम फेरीत युक्रेनचा २.५-१.५ असा पराभव करून सुवर्णपदक निश्चित केले. निर्णायक सामन्यात ग्रँडमास्टर रोमन देह्तियारोव्हचा पराभव करून यजमान संघासाठी ग्रँडमास्टर मुखिद्दिन मदामिनोव्ह विजयाचा शिल्पकार ठरला.उझबेकिस्तान भारत आणि जर्मनीपेक्षा दोन गुणांनी पुढे राहिले, तर 'टाय-ब्रेक'च्या आधारे भारताने दुसरे स्थान पटकावले. नेदरलँड्सचा २.५-१.५ असा पराभव करून जर्मनीने तिसरे स्थान मिळवले. यात ग्रँडमास्टर मॅथियास ब्ल्यूबॉमने ग्रँडमास्टर जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव केला.
दरम्यान, जॉर्जियाविरुद्धचा अंतिम फेरीतील रोमांचक सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यामुळे भारताच्या महिला संघाने कांस्य पदक जिंकले. जॉर्जियाच्या इंटरनॅशनल मास्टर मेरी अराबिद्झेविरुद्ध कठीण परिस्थितीतून सामना बरोबरीत सोडवून भारताच्या इंटरनॅशनल मास्टर सविता श्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारताला पदक मिळवून देण्यात मदत केली. व्हिएतनामचा ३-१ असा पराभव करून चीनने महिलांचे सुवर्णपदक जिंकले, तर पोलंडविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यामुळे कझाकस्तानने रौप्य पदक पटकावले. चीनने दोन गुणांच्या फरकाने अव्वल स्थान गाठत महिला चेस ऑलिम्पियाडमधील आपले सातवे सुवर्णपदक जिंकले. टाय-ब्रेकच्या आधारे अमेरिका, पोलंड, आर्मेनिया आणि मंगोलियासह अनेक संघांना मागे टाकत भारताने कांस्यपदक पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे