
आठवडाभरात तक्रारी सादर करण्याची मुदत
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत किंमत स्थिरीकरण निधी (PSF) योजनेंतर्गत NAFED व NCCF या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून हंगाम २०२६-२७ साठी कांदा खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितता अथवा गैरव्यवस्थापनाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीमध्ये संबंधित प्रांत अधिकारी, संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केलेली व्यक्ती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.
कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता अथवा गैरव्यवस्थापन झाल्याबाबत लोकप्रतिनिधी, कांदा उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक संघटनांकडून शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
तक्रारींसोबत पुरावे, कागदपत्रे जोडावीत
कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, व्यापारी तसेच सर्व संबंधित नागरिकांना कांदा खरेदी प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अनियमितता, गैरव्यवस्थापन अथवा अन्य संबंधित बाबींची माहिती असल्यास ती लेखी स्वरूपात एक आठवड्याच्या आत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसोबत संबंधित बाबींचे उपलब्ध पुरावे, कागदपत्रे अथवा अन्य आवश्यक माहिती जोडावी. त्यामुळे चौकशी समितीस संबंधित तक्रारींची वस्तुनिष्ठरीत्या पडताळणी करून तथ्यांच्या आधारे चौकशी करणे शक्य होणार आहे.
सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेऊन कांदा खरेदी प्रक्रियेशी निगडित तक्रारी व उपलब्ध माहिती विहित मुदतीत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI