
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। बंदुकीच्या फैरींचा कडकडाट... बारुदाच्या गोळ्यांचे आवाज... ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी हत्तीबेटाचा परिसर दुमदुमून गेला. रझाकारांविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा थरार दाखवत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हत्तीबेट (देवर्जन) येथील धाडसी संघर्षाचा इतिहास तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी नाट्यरूपातून जिवंत केला. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या वतीने हत्तीबेटावर साकारलेला हा ऐतिहासिक संघर्षनाट्य प्रयोग उपस्थितांसाठी रोमांचकारी आणि प्रेरणादायी ठरला.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेतून ‘हत्तीबेटावरील धाडसी झुंज’ या ऐतिहासिक संघर्षनाट्याची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने ४०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी हत्तीबेटाच्या ऐतिहासिक भूमीवरच या संघर्षाचा प्रसंग साकारला.
रझाकारांविरुद्धचा संघर्ष रंगला--!
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीखालीच राहिले. निजामाच्या रझाकारांविरुद्ध मराठवाड्यात स्वातंत्र्यसैनिक, किसान दल आणि आर्यवीर दलाने संघर्ष उभारला. उदगीर परिसरातील हत्तीबेट हे या लढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
२७ सप्टेंबर १९४७ रोजी हत्तीबेटावर किसान दल आणि निजामी लष्कर यांच्यात झालेल्या संघर्षाची पार्श्वभूमी तब्बल ७९ वर्षानंतर या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली. रझाकारांचे आक्रमण, गावकऱ्यांचा प्रतिकार, किसान दल व आर्यवीर दलाच्या सैनिकांचे धैर्य आणि युद्धकौशल्य तसेच महिलांनी दिलेली साथ अशा विविध प्रसंगांचे प्रभावी नाट्यरूप सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
बंदुकीच्या फैरी आणि बारुदाच्या आवाजाने वातावरणात संघर्षाचा थरार निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी हत्तीबेटाचा परिसर भारावून गेला. इतिहासातील घटना केवळ पुस्तकात वाचण्याऐवजी त्याच ऐतिहासिक भूमीवर प्रत्यक्ष साकारल्याने विद्यार्थ्यांना त्या काळातील संघर्षाची अनुभूती मिळाली.
‘इतिहास पुस्तकापुरता नको’
‘इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंग केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. त्यांच्यामध्ये देशप्रेम, धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची भावना रुजावी, या उद्देशाने हा प्रयोग हत्तीबेटावर साकारण्यात आला,’ असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुपोषपाणि आर्य यांनी सांगितले.
उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे यांनी हत्तीबेटाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज व्यक्त केली. हा इतिहास पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर यांच्या हस्ते थोर स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव साकोळकर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून नाट्यप्रयोगास प्रारंभ झाला. पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष व्ही. एस. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव प्रा. एस. एस. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मुरलीधर जाधव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis