
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) : कोट्यवधी डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदीचा कथित साथीदार संदीप मिस्त्री याला केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) संयुक्त अरब अमिरातीमधून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणले आहे. प्रत्यार्पणानंतर मंगळवारी मुंबईत त्याला औपचारिकपणे अटक करण्यात आली.
अटकेनंतर सीबीआयने मिस्त्रीला विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. मात्र, तपास यंत्रणेने त्याच्या कोठडीची मागणी केली नाही. न्यायालयाने मिस्त्रीला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
नोव्हेंबर 2025 मध्ये विशेष न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँगस्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता.
सीबीआयच्या आरोपानुसार, मिस्त्रीने नीरव मोदी आणि अन्य आरोपींसोबत कथित गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली. या कटाद्वारे पंजाब नॅशनल बँकेची अंदाजे ₹6,498.20 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
सीबीआयने आणखी आरोप केला आहे की, भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर मिस्त्रीने नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी आणि अन्य आरोपीसोबत मिळून दुबईतील मोदीशी संबंधित विविध कंपन्यांमधील कर्मचारी व डमी संचालकांना देश सोडण्याची धमकी दिली. त्यांना कैरो येथे स्थलांतरित होण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मोबाईल फोन नष्ट केल्याचाही सीबीआयचा आरोप आहे.
या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने मुंबईतील ब्रेडी हाऊस येथील पीएनबी शाखेत बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज (LoUs) जारी करून बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे