
मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.) : सुपरस्टार नानीचा 'द पॅराडाईज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या माहितीनुसार, श्रीकांत ओडेला दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी ४.४० कोटी रुपयांची कमाई केली.
भारतातील या चित्रपटाचे एकूण निव्वळ संकलन (नेट कलेक्शन) १०१.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर, सहा दिवसांच्या कालावधीत या चित्रपटाने जगभरात १५०.५० कोटी रुपयांची एकूण कमाई (ग्रॉस कलेक्शन) केली आहे. या चित्रपटात राघव जुयाल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
दुसरीकडे, सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा 'द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' (The One: Force of the Forest) हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपली पकड टिकवून आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मंगळवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी ६ कोटी रुपयांची कमाई केली. त्याआधी, सोमवारी या चित्रपटाने ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. वीकेंडला या चित्रपटाने एकूण ३३.६० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे भारतातील त्याचे एकूण निव्वळ संकलन ४४.८५ कोटी रुपये झाले आहे.
परदेशातील कामगिरीबद्दल सांगायचे तर, 'द वन'ने आतापर्यंत ४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्याचे जगभरातील एकूण संकलन ५७.९५ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्याव्यतिरिक्त, यात सुनील ग्रोव्हर, श्वेता तिवारी, अनूप सोनी आणि मनीष पॉल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर