
नवी दिल्ली,07 सप्टेंबर (हिं.स.) : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) भारतीय वायुसेनेला दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या एचटीटी-40 बेसिक ट्रेनर विमानांची पहिली तुकडी सुपूर्द करण्यासाठी सज्ज झाली आहे. तीन एचटीटी-40 विमाने डिलिव्हरीसाठी पूर्णपणे तयार असून, या विमानांच्या समावेशामुळे नव्या पायलटांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तयार असलेल्या तीन एचटीटी-40 विमानांपैकी दोन विमाने बंगळुरू येथे, तर एक विमान नाशिक येथील एचएएलच्या प्रकल्पात तयार करण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने 3 वर्षांपूर्वी नव्या पायलटांच्या प्रशिक्षणासाठी 6,838 कोटी रूपयांच्या खर्चातून 70 बेसिक ट्रेनर विमानांची ऑर्डर एचएएलला दिली होती. करारानुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 12 ट्रेनर विमाने वायुसेनेला सुपूर्द करणे अपेक्षित होते. मात्र, इंजिनच्या कमतरतेमुळे एचएएलला निर्धारित वेळेत एकाही विमानाची डिलिव्हरी करता आली नव्हती. दरम्यान, अमेरिकेतील हनीवेल कंपनीने पुरवठा साखळीतील अडथळे दूर करत काही महिन्यांपूर्वी टीपीई331-12बी टर्बोप्रॉप इंजिनांची पहिली तुकडी एचएएलला सुपूर्द केली. भविष्यातही इंजिनांचा वेळेवर पुरवठा करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
एचटीटी-40 साठी 88 टीपीई331-12बी इंजिन आणि किट्सच्या पुरवठा व निर्मितीसाठी चार वर्षांपूर्वी हनीवेलसोबत 100 दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला होता. या करारानुसार सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्या इंजिनचा पुरवठा अपेक्षित होता. करारानुसार 16 इंजिनांचा थेट पुरवठा हनीवेलकडून केला जाणार असून, उर्वरित इंजिनांचे उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून भारतातच एचएएलकडून केले जाणार आहे.वायुसेनेच्या गरजा वेगाने पूर्ण करण्याच्या उद्देशाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिक येथे एचटीटी-40 बेसिक ट्रेनर आणि एलसीए-एमके1ए यांच्या उत्पादन लाइनचे उद्घाटन केले होते. उत्पादन क्षमता वाढवल्यानंतर एचएएलच्या बंगळुरू आणि नाशिक येथील प्रकल्पांमध्ये दरवर्षी एकूण 20 एचटीटी-40 सध्या भारतीय वायुसेनेतील नव्या पायलटांचे सुरुवातीचे स्टेज-1 फ्लाइंग ट्रेनिंग स्विस बनावटीच्या पिलॅटस पीसी-7 एमके-II बेसिक ट्रेनर विमानांवर केले जाते.
ही प्राथमिक प्रशिक्षण प्रक्रिया सर्व पायलटांसाठी समान असते. त्यानंतर पायलटांना फायटर, ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर अशा तीन प्रवाहांमध्ये विभागले जाते.
फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या पायलटांचे स्टेज-2 प्रशिक्षण पीसी-7 एमके-II आणि स्वदेशी किरण एमके-1ए जेट ट्रेनर विमानांवर केले जाते. त्यानंतर अंतिम म्हणजेच स्टेज-3 प्रशिक्षण ब्रिटिश बनावटीच्या हॉक एडव्हान्स्ड जेट ट्रेनर विमानांवर घेतले जाते.-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी