अकोला, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। गरीब आणि गरजूंना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून देणारी राज्य सरकारची 'शिवभोजनथाळी योजना' निधी अभावी सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. ऑक्टोबर 2024 पासून केंद्र चालकांना शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त झालेले नाही, जवळपास साडेसात कोटी रुपये थकल्याची खंत केंद्र चालक सांगत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रचालक आर्थिक तणावाखाली आहेत.
अनुदान न मिळाल्याने अनेक केंद्रचालकांना उसनवार करून थाळीयोजना सुरू ठेवावी लागत आहे. आधीच थाळीसाठी मिळणारे अनुदान तुटपुंजे असल्याची तक्रार होती, त्यात आता तेही महिनोन्महिने विलंबाने वितरित होत असल्याने केंद्र चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या परिस्थितीत शिवभोजन केंद्र टिकवणे अवघड झाले असून काही ठिकाणी केंद्र बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शासनाने दिवाळी पूर्वी निधी उपलब्ध करून न दिल्यास योजना टिकवणे अडचणीचे असल्याचा इशारा केंद्रचालकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे