अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोल्यातील आलेगाव येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोट लिहून तसेच व्हॉट्सअॅप स्टेटस टाकून आपले जीवन गुरुवार मध्यरात्री संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय बोचरे हे ओबीसी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते. तसेच ते मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून अकोल्यात ओळखले जात होते. या घटनेनंतर बोचरे कुटुंबीयांशी ओबीसी नेत्या मायाताई इरतकर यांच्या फोनवरून मंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. तुम्ही धीर धरा, आम्ही लढतोय. आपला हक्क आपण मिळवणार, असा आत्मविश्वासही भुजबळ यांनी कुटुंबीयांना दिला. या घटनेमुळे ओबीसी समाजात तीव्र भावना उमटल्या असून, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा चळवळीला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे