रत्नागिरी, 11 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूखमधील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांचे अपहरण आणि लूट प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत तपास करत आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागटे यांचे साखरपा येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू शेट्ये व व्यापारी धनंजय केतकर यांनी रत्नागिरी पोलीस मुख्यालयात भेट घेऊन अभिनंदन केले.
अलीकडेच देवरूखचे व्यापारी केतकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्यात आले, तसेच खंडणीची मागणी करून मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागटे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी देवरूख पोलीस ठाणे आणि गुन्हा अन्वेषण विभागाला विशेष मार्गदर्शन केले.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या प्रकरणात चार आरोपींना अटक केली. त्यातील दोन आरोपी परिसरातील स्थानिक असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आणखी आरोपींचा सहभाग उघड होत असून, आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर पाच आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईत देवरूख पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक यांनी तातडीने समन्वय साधून तपास जलदगतीने पूर्ण केला. या धडाकेबाज कारवाईमुळे जनतेत पोलिसांविषयी विश्वास वाढला असून, गुन्हेगारीवर कठोर अंकुश बसणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यासाठीच पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी