ठाणे, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न झाली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, म्हाडाचे इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, म्हाडाच्या कोकण विभागाची जवळपास 5 हजार 354 घरांची सोडत आज संपन्न झाली. आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे. प्रत्येकाचं घर हे स्वप्न असते आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे. ज्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांची दिवाळी नवीन घरात होईल, गोड होईल आणि ज्यांना लॉटरी नाही लागली त्यांनीही निराश होवू नये. एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतीच घर किंवा एक इमारत एवढ्या पुरतं ते मर्यादित नसून घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातले एक मोठे स्वप्न असते आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्म सन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो.
आज 5 हजार 354 घरे आणि 77 भूखंडांसाठी संगणकीय पद्धतीने लॉटरी काढण्यात आली असून यामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आम्ही सुरुवातीपासून हीच भूमिका ठेवली की, जी लॉटरी निघेल त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याला घर मिळणार नाही. अशा पारदर्शक कार्यपद्धतीमुळे म्हाडावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे. मगाशी मला संजीव जयस्वाल म्हणाले की, 5 हजार 354 घरांसाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे, वाढत चाललेला आहे. आता म्हाडाची घरं उत्तम दर्जाची आणि वेळेमध्ये पूर्ण होत आहेत. त्यामुळे एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम म्हाडाने केलेलं आहे. परवडणारे घर देणारे कुठले प्राधिकरण तर म्हाडा हे नाव आपण घेतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडा केवळ एक गृहनिर्माण संस्था नाहीये तर सर्वसामान्यांचे आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारी विश्वासाची शिदोरी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आम्ही म्हाडाची एक नवीन पॉलिसी आणली. या नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरे याला प्रथम प्राधान्य दिले आहे. यामध्ये आपल्या नोकरदार महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वसतीगृह व गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेमधून देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी दोन कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले होते. क्लस्टरच्या माध्यमातून आपण एक मोठा निर्णय घेतला. जसं बाळासाहेब म्हणायचे की, मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर देण्याचं, तेव्हा लोकांना वाटलं की हे साध्य होईल का. परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आता आपण केलेली आहे आणि आता आपण टप्प्याटप्प्याने घर बांधतोय आणि त्याची सुरुवात झाली याचा मला अभिमान आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर मधील घरांचा प्रकल्प आहे तिथे एसआरए आणि एमएमआरडीए एकत्रितपणे काम करीत आहेत. मुंबई महानगर प्रदेशाचा आपल्याला पुनर्विकास करायचा असेल तर रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर हे सगळे जॉईंट वेंचर केले पाहिजेत. कारण सरकारी प्राधिकरणावर लोकांचा विश्वास असतो आणि वेळेमध्ये काम करण्याची जी क्षमता आहे यामधून मोठ्या प्रमाणावर लाखो घरे तयार होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर